शिर्डीत आज वातावरण चिघळणार? फलक काढण्यासाठी तृप्ती देसाई पुण्याहून रवाना

शिर्डी : शिर्डी देवस्थानकडून ड्रेसकोडसंबंधी लावण्यात आलेल्या बोर्डविरोधात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आक्रमक झाल्या आहेत. तृप्ती देसाई यांनी शिर्डीत येऊन साई संस्थानाने लावलेला आवाहनाचा फलक काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार तृप्ती देसाई पुणे येथून शिर्डीसाठी रवाना झाल्या आहेत. दरम्यान तृप्ती देसाई शिर्डीत येणार असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. अहमदनगर पोलीस त्यांना सीमेवरच रोखण्याची शक्यता आहे.

तृप्ती देसाईंच्या भूमिकेविरोधात स्थानिक शिवसेना महिला पदाधिकारी आणि शिर्डीच्या ग्रामस्थांनी कडक भूमिका घेतली आहे. धार्मिक स्थळांना भेट देताना काही संकेत पाळणं गरजेचं आहे त्यामुळे तृप्ती देसाईंना धडा शिकवू असं म्हटलं आहे. अहमदनगर पोलिसांनी संघर्ष टाळण्यासाठी तृप्ती देसाई यांना 8 ते 11 डिसेंबरपर्यंत शिर्डीत येण्यास मज्जाव केला आहे. त्यानंतरही तृप्ती देसाई या शिर्डीला जाण्यावर ठाम आहेत.

तृप्ती देसाईंच्या इशाऱ्यानंतर आता शिर्डीत फलकाचे राजकरण तापू लागले असून देसाई यांना विरोध करण्यासाठी विविध हिंदू संघटना सक्रिय झाल्या आहेत. ब्राम्हण महासंघाचे आंनद दवे आपल्या कार्यकर्त्यांसह शिर्डीत दाखल झाले असून तृप्ती देसाई शिर्डीत आल्या तर जशास तसे उत्तर देण्याचा इशारा ब्राम्हण महासंघाने दिला आहे.

जाणून घ्या नेमकं प्रकरण –

साई मंदिरात दर्शन करायला येताना भारतीय पोशाखात यावं अथवा सबाह्य कपडे घालावे असं आवाहन करणारे फलक मंदिर परिसरात दोन दिवसापूर्वी लावले आहेत. हा निर्णय खूप पूर्वीचा असला तरी केवळ फलक लावल्यानं आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी 10 डिसेंबरला शिर्डीत येऊन फलक काढण्याचा इशारा दिल्यानंतर आता शिर्डीत ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून भविष्यात तृप्ती देसाई यांनी असं काही केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेतलाय. एकीकडे संस्थानच्या या निर्णयाचा ज्या साई भक्तांवर याचा परिणाम होणार आहे, त्यांनी मात्र आपल्या प्रतिक्रिया देताना काहींनी स्वागत केलं आहे. तर काहींनी हा निर्णय चुकीचा वाटतो. मात्र अशा आवाहनामुळे राजकारण करु नये अशीही भावना भक्तांनी बोलून दाखवली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.