शिर्डीला पोहोचण्याआधीच तृप्ती देसाईंना ताब्यात घेतलं, सूपा पोलिस ठाण्याकडे रवाना

अहमदनगर :  साईबाबा संस्थानच्या ड्रेसकोडबाबत भक्तांना आवाहन करणारे फलक लावल्यानंतर आता या फलकावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. तृप्ती देसाई आज शिर्डीला बोर्ड हटविण्यासाठी जात असताना त्यांना अहमदनगरच्या सुपे टोलनाक्यावर अडवण्यात आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिर्डीपासून 100 किलोमीटर आधीच तृप्ती देसाई आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. थोड्याच वेळात त्यांना सुपे पोलिस स्टेशनला घेऊन जातील, अशी माहिती आहे.

दरम्यान यावेळी बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की,  आज मानवाधिकार दिन आहे, त्या दिवशी आम्हाला अडवलं आहे. साई संस्थाननं लावलेला बोर्ड हटवण्यासाठी जात आहे. पोलिस म्हणत आहेत, चर्चा करा. मात्र संविधानाच्या अधिकाराचं हनन आहे. आमची भूमिका आहे की पोलिसांनी आमच्यासोबत यावं आणि बोर्ड हटवण्यास मदत करावी. असा निर्णय घेणाऱ्या शिर्डी संस्थानवर कारवाई करायला हवी मात्र इथं आम्हालाच अडवलं जात आहे असं त्या म्हणाल्या.  काहीही केलं तरी आम्ही शिर्डीला जाणारच आहोत, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. आम्ही शांततापूर्ण वातावरणात जात आहोत. आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, मात्र आम्ही जाणारच आहोत, असं देसाई म्हणाल्या.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी संस्थानने त्वरित बोर्ड हटविण्याची मागणी केली असून तो नाही हटवला तर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर आज सकाळपासून शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मंदिर परिसरात लावलेल्या फलकांजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिर्डी संस्थाननं केलेल्या ड्रेस कोडविरोधात आज तृप्ती देसाई थेट शिर्डीत जाऊन बोर्ड काढणार होत्या, मात्र त्यांना आधीच ताब्यात घेतलं

तृप्ती देसाईंच्या भूमिकेविरोधात स्थानिक शिवसेना महिला पदाधिकारी आणि शिर्डीच्या ग्रामस्थांनी कडक भूमिका घेतली आहे. धार्मिक स्थळांना भेट देताना काही संकेत पाळणं गरजेचं आहे त्यामुळे तृप्ती देसाईंना धडा शिकवू असं म्हटलं आहे. अहमदनगर पोलिसांनी संघर्ष टाळण्यासाठी तृप्ती देसाई यांना 8 ते 11 डिसेंबरपर्यंत शिर्डीत येण्यास मज्जाव केला आहे. त्यानंतरही तृप्ती देसाई या शिर्डीला जाण्यावर ठाम आहेत.

तृप्ती देसाईंच्या इशाऱ्यानंतर आता शिर्डीत फलकाचे राजकरण तापू लागले असून देसाई यांना विरोध करण्यासाठी विविध हिंदू संघटना सक्रिय झाल्या आहेत. ब्राम्हण महासंघाचे आंनद दवे आपल्या कार्यकर्त्यांसह शिर्डीत दाखल झाले असून तृप्ती देसाई शिर्डीत आल्या तर जशास तसे उत्तर देण्याचा इशारा ब्राम्हण महासंघाने दिला आहे.

 

जाणून घ्या नेमकं प्रकरण –

साई मंदिरात दर्शन करायला येताना भारतीय पोशाखात यावं अथवा सबाह्य कपडे घालावे असं आवाहन करणारे फलक मंदिर परिसरात दोन दिवसापूर्वी लावले आहेत. हा निर्णय खूप पूर्वीचा असला तरी केवळ फलक लावल्यानं आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी 10 डिसेंबरला शिर्डीत येऊन फलक काढण्याचा इशारा दिल्यानंतर आता शिर्डीत ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून भविष्यात तृप्ती देसाई यांनी असं काही केल्यास जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेतलाय. एकीकडे संस्थानच्या या निर्णयाचा ज्या साई भक्तांवर याचा परिणाम होणार आहे, त्यांनी मात्र आपल्या प्रतिक्रिया देताना काहींनी स्वागत केलं आहे. तर काहींनी हा निर्णय चुकीचा वाटतो. मात्र अशा आवाहनामुळे राजकारण करु नये अशीही भावना भक्तांनी बोलून दाखवली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.