खळबळजनक ! महिला पोलिसानेच केले तरुणाचे अपहरण, खंडणी म्हणून मागितली किडनी

पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेत  कार्यरत असणाऱ्या पोलीस शिपाई महिलेने एका तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवले. त्यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारातील पैसे देण्याचे अमिश दाखवून पिंपरीतील पोलीस शिपाई महिलेने पुण्यातील पोलीस शिपाई नातेवाईक, तिची आई आणि अन्य चार जणांसोबत मिळून तरुणाचे अपहरण केले. इंदापूर जवळील जंगलात नेऊन त्याला मारहाण केली. तरुणाचे आणि पोलीस शिपाई महिलेचे फोटो आणि व्हिडीओचा पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणाचा मोबाईल फोडून टाकला. त्यात भरीस भर म्हणजे आरोपींनी तरुणाला चक्क दहा लाख रुपये अथवा किडनीची खंडणी मागितली. हा प्रकार 5 डिसेंबर रोजी भर दिवसा घडला.

महिला पोलीस शिपाई मनिषा साळवे, शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपाई विजय कुमार साळवे, नंदकुमार कांबळे, अक्की लोंढे, सनी लोंढे, विनय लोंढे, मनिषा साळवे यांची आई (संपूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात खंडणी, अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सुरज असगर चौधरी (वय-21 रा. त्रिवेणीनगर, ओटा स्किम, निगडी ) याने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पोलीस शिपाई मनीषा साळवे ही पिंपरी वाहतूक शाखेत कार्यरत आहे. तर आरोपी विजय साळवे हा पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे नेमणुकीस आहे. आरोपी मनीषा हिचे आणि फिर्यादी सूरजचे अनैतिक संबंध होते. मनीषा हिने सूरजकडून काही रक्कम घेतली होती.  ते पैसे देण्यासाठी आरोपीने सुरजला 5 डिसेंबर रोजी थेरगाव येथील रॉयल कोर्ट सोसायटी समोर बोलावून घेतले.

सुरज 5 डिसेंबर रोजी सकाळी सव्वादहा वाजता बोलावलेल्या ठिकाणी गेला. त्यानंतर आरोपींनी सुरजला एका गाडीत जबरदस्तीने बसवून इंदापूर जवळ असलेल्या जंगलात नेले. त्याठिकाणी आरोपींनी सूरजला लाकडी दांडक्याने, कोयत्याने मारहाण केली. तसेच सूरजचा मोबाईल घेऊन मोबाईलमधील फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्याच्या उद्देशाने फोडून फेकून दिला.

आरोपींनी सूरजकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. दहा लाख रुपये दे अथवा तुझी किडनी दे, अशी मागणी करीत धमकी दिली. या प्रकरणी आठवड्यानंतर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाकड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पवार तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.