ठाण्यातील ‘कोविड हेल्थ सेंटरचे’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई लोकार्पण

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील तसेच परिसरातील कोरोनाबाधित नागरिकांना तातडीने औषधोपचार व वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून घोडबंदर परिसरातील बोरिवडे येथे ठाणे महानगरपालिका आणि झी एंटरटेन्टमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक सुविधांनीयुक्त उभारण्यात आलेल्या कोविड हेल्थ सेंटरचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के, स्थायी समिती सभापती संजय भोईर, महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा, नगरसेवक नरेश  मणेरा, नगरसेवक सिद्धार्थ ओवळेंकर, अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देखमुख यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना विरोधी लढ्यात सक्रिय आहे. प्रत्येक नागरिकाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या न्यायाने आचरण ठेवले आणि शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाची दुसरी लाट थोपविणे सहज शक्य आहे. यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले.

संपूर्ण प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीला जनतेने दिलेल्या साथीमुळे, सहकार्यामुळे आपण कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेऊ शकलो.   शासनाने जबाबदारी घेतली आहे. आपण फक्त खबरदारी घेतल्यास कोरोनावर मात करणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

या संकटकाळात युध्द पातळीवर आरोग्य सुविधा  उपलब्ध करण्यात आल्या आहेत संभाव्या दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांच्या देखील चांगल्या आरोग्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कोविडनंतर पोस्ट कोविड हा देखील सतावणारा मुद्दा लक्षात घेऊन त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. ठाणे मनपाने पोस्ट कोविड सेंटर सुरू करुन नागरिकांच्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्व दिले आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोरोना आपत्तीमध्ये राज्यशासनाने घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यात मृत्यूदर कमी करण्यास यश मिळाले आहे. इतर राज्य देखील महाराष्ट्र शासनाचे अनुकरण करत आहेत.

ठाणे जिल्ह्यात प्रभावीपणे आरोग्य यंत्रणा कार्यरत आली आहे त्यामुळे एकही रुग्ण आरोग्य सुविधेपासुन वंचित राहणार नाही. ठाणे महापालिकेच्यावतीने कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविड 19 चा सामना करण्यासाठी ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे त्या सर्व सुविधा अद्ययावत ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित नागरिकांना तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून बोरिवडे येथील सर्व सुविधांनीयुक्त कोव्हीड हेल्थ सेंटर महत्वाचे ठरणार असल्याचे श्री.शिंदे यांनी सांगितले.

मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत घोडबंदर परिसरात बोरिवडे येथील महापालिकेच्या मैदानात झी एटरटेन्टमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडच्यावतीने डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर उभारण्यात आले आहे. या ठिकाणी रुग्ण नोंदणी, तपासणी कक्ष, डॉक्टर्स, नर्स लॉजस, व्यवस्थापन कक्ष, हाऊस किपिंग स्टोअर्स, फार्मसी स्टोअर, फुड स्टोअर, लिनन – क्लिन युटीलीटी, डोनींन -डॉफिंग रुम, डर्टि युटीलीटी, प्रसाधन गृहे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी एकूण ३०६ बेडची सुविधा असून त्यापैकी २०८ ऑक्सिजन बेड, ९६ नॉन ऑक्सिलनेटेड व २ ट्राएज बेडचा समावेश आहे.

या ठिकाणी सेंटर उभारणेसाठी आवश्यक ती स्थापत्य, पाणीपुरवठा व मल:निसारण व आरोग्य विभागाची सर्व कामे ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.