प्रेमाला विरोध करणाऱ्या आजीसह नातवाची निर्घृण हत्या, मग रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, नागपुरात खळबळ

नागपूरः एकतर्फी प्रेमाला विरोध केल्याने तरुणीच्या आजीची आणि तिच्या लहान भावाची चाकुने भोसकून हत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारी ३.३०च्या सुमारास गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हजारीपहाड परिसरात घडली. या  हत्येने नागपुरात खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपीने काल रात्री आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. हा आरोपी अल्पवयीन होता. त्याने मनकापुर परिसरात रेलवे ट्रॅक वर रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली.

लक्ष्मीबाई धुर्वे (वय ७०. रा. हजारीपहाड) आणि यश धुर्वे (वय १०)अशी या मृतकांची नावे आहेत. या प्रकरणात मोईन खान नावाचा व्यक्ती संशयित आरोपी होता.

मिळालेल्या माहितीनुसार,मृत आजीच्या नातीवर आरोपी मोईन खानचे एकतर्फी प्रेम होते. तरुणीचे कुटुंब कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे.तरी ते तरुणीला नागपूरच्या नावाजलेल्या महाविद्यालयात शिकवत होते, ती द्वितीय वर्षात होती. तर तरुण साडे सतरा वर्षाचा असून कोणतंही काम धंदा करत नव्हता. तरुण आणि तरुणी दोघे नागपूरच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात राहतात. सुमारे दीड वर्षापूर्वी Instagram वर एकमेकांचे फोटो पाहून ओळख झाली. महाविद्यालयाजवळ भेटही झाली.

तरुणीच्या कुटुंबियांना तिच्या मोबाईल द्वारे या मैत्रीची माहिती मिळाली. त्यांनी तिला अभ्यासात लक्ष घालायला सांगत त्याच्या पासून दूर राहण्यास सांगितले. तिचा मोबाईल काढून घेत त्या तरुणाच्या कुटुंबियांना भेटून माहिती त्यांनाही दिली. कुटुंबियांनी समजूत घातल्यानंतर तरुणी त्याला टाळू लागली. तरी तो तरुण नागपूरच्या दुसऱ्या कोपऱ्यात राहणाऱ्या तरुणीच्या कृष्णगर भागात यायचा. तरुणीच्या कुटुंबियांशी वाद घालायचा. एकदा तर तरुणीच्या भावाला मारहाणही केली होती.

माहितीनुसार, तो माथेफिरू भेटण्यासाठी त्या तरुणीवर दबाव आणायचा, तिला मारहाण करायचा. 15 दिवसांपूर्वी ही त्याने तिला जबर मारहाण केली होती. त्यात तिच्या एका डोळ्याला जबर दुखापत झाली होती. तेव्हा धुर्वे कुटुंबातील काही कौटुंबिक मित्रांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ती तरुणी मारहाणीनंतर एवढी जास्त घाबरलेली होती की तिची अवस्था पाहून तिच्या कुटुंबियांनी तक्रार देण्यास नकार दिला होता. शिवाय तो तरुण सतत धुर्वे कुटुंब राहत असलेल्या भागात यायचा. मारहाणीत डोळ्याला जबर दुखापत झाल्यानंतर परिसरात तिची ती अवस्था पाहून बदनामी होईल म्हणून धुर्वे कुटुंबियांनी आपल्या मुलीला नातेवाईकांकडे पाठवले.त्यामुळे तिला भेटणे अशक्य झाले. यातून त्याचा पारा अधिकच चढला.

काल दुपारी धुर्वे दाम्पत्य आपल्या कामावर गेल्यानंतर घरी लक्ष्मीबाई आणि चिमुकला यश हे दोघेच होते. त्याच वेळी तो तरुण त्या ठिकाणी आला आणि त्याने आपल्या हातातील धारधार शस्त्राने लक्ष्मीबाई आणि यशचा खून केला. शेजाऱ्यांनी धुर्वे यांच्या घरातून आलेल्या आवाजानंतर तिथे जाऊन पाहिले असता दुहेरी हत्याकांडाची ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोली मोईन खानचा शोध घेत होते. तो कालपासून फरार होता. मात्र, आज त्यानेच आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

काल दुपारी दोघांची हत्या केल्यानंतर आरोपी एक्टिव्हाने मानकापूर परिसरात गेला. तिथे रात्री 9 वाजून 26 मिनिटांनी जाणाऱ्या केरळ एक्स्प्रेस समोर उडी घेऊन आत्महत्या केली. केरळ एक्स्प्रेसच्या ड्रायवरने रेल्वे एकाने रेल्वे समोर आत्महत्या केल्याची कंट्रोल रूमला माहिती दिली.रेल्वे कंट्रोल रूम ने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली, त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर दुहेरी हत्याकांडाच्या आरोपीने आत्महत्या केल्याची स्पष्ट झाले.त्याने आत्महत्या का केली याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, मोईन खानच्या आत्महत्येने सध्या या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. त्याने ही आत्महत्या का केली असावी याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेच, याप्रकरणी पोलिसांनी आत्यहत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.