टीआरपी घोटाळा प्रकरण : रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक

मुंबई : काही महिन्यापूर्वी उघडकीस आलेल्या टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी  रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. याआधीही टीआरपी घोटाळ्यासंबंधी पोलिसांनी विकास खानचंदानी यांची चौकशी केली होती. दरम्यान, आतापर्यंत टीआरपी घोटाळ्यात एकूण 13 जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी रिपब्लिक चॅनेलचा टीआरपी घोटाळा उघडकीस आणला होता. बॅरोमिटरमध्ये फेरफार करून टीआरपी आकडे वाढवले जात होते.याबाबत मुंबई पोलिसांनी कारवाई करून जणांना अटक केली होती. या व्यक्तींच्या चौकशीत आरोपींनी रिपब्लिक चॅनेल पैसे देऊन लोकांना आपलं चॅनेल बघायला भाग पाडत असल्याचं उघडकीस आलं होतं.

टीआरपी घोटाळा उघडकीस आल्यानंतर रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांची सुरुवातीला चौकशी करण्यात आली होती. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी विकास खानचंदानी यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं होतं. त्यावेळी मात्र विकास खानचंदानी चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर ते क्राईम ब्रांचसमोर चौकशीसाठी हजर राहिले होते

गेल्या तीन महिन्यांपासून टीआरपी घोटाळ्याचा मुंबई पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. याच प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत अनेकांची चौकशी झाली असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच टीआरपी घोटाळ्या प्रकरणी पुढील तपास क्राईम ब्रांचकडून सुरु आहे.

बीएआरसी आणि हंसा या कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांकडून हे रॅकेट चालवण्यात येत होते. या माध्यमातून फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या वाहिन्यांना अवैधरित्या वाढीव टीआरपीचा लाभ मिळाला होता, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली.

याप्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या चालकांना अटक करण्यात आली. तर रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठीही रॅकेट चालवणाऱ्यांकडून मदत घेण्यात आल्याची माहितीही समोर आल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. त्यामुळे आता रिपब्लिक टीव्हीच्या प्रवर्तकांची चौकशी सुरु होती.

काय आहे प्रकरण?

“रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी काही लोकांना पैसे देऊन आपल्या घरात दिवसभर हे चॅनेल सुरु ठेवण्यास सांगण्यात आले होते. यासाठी प्रत्येकी 400 ते 500 रुपये दिले जात असत. त्यामुळे चॅनेलच्या टीआरपीत मोठी वाढ दिसून आली होती. याचा थेट फायदा जाहिराती मिळवण्यासाठी होत असे. त्यामुळे आता या टीआरपीच्या आधारे संबंधित चॅनेल्सला मिळालेल्या जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. तसेच हे जाहिरातदारही या रॅकेटमध्ये सहभागी होते का, याचा तपास केला जाईल” अशी माहिती परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टीआरपी म्हणजे काय?

टीआरपीचा अर्थ टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट असा होतो. यावरुन प्रेक्षक कोणते टेलिव्हिजन चॅनेल जास्त पाहतात, हे ठरवले जाते. टेलिव्हिजन विश्वात कोणती मालिका किंवा वृत्तवाहिन्यांवरील कोणता शो सर्वात जास्त लोकप्रिय आहे, याचे मोजमापही टीआरपीच्या आधारेच केले जाते. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जाहिराती मिळवण्यासाठी टीआरपी रेटिंग अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.