पीएमआरडीएच्या हद्दीतील सर्वच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून गुन्हे दाखल करा

वाघोलीतील अकरा जणांची निवेदनाद्वारे पीएमआरडीए आयुक्तांकडे मागणी

वाघोली(सोमनाथ आव्हाळे)  : वाघोलीतील (ता. हवेली) जेएसपीएम शैक्षणिक संकुलाच्या शेजारी असणाऱ्या अनधिकृत बांधकामावर पोलीस बंदोबस्तात पीएमआरडीएच्यावतीने कारवाई करून अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पीएमआरडीएकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत काहीही हरकत नाही परंतु केवळ काही विशिष्ट बांधकामांवर कारवाई न करता पीएमआरडीएच्या हद्दीत मोठ्यासंख्येने असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे कारवाई करण्यात आलेल्या अकरा जणांनी पीएमआरडीए आयुक्त यांचेकडे केली आहे.

पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्यानंतर दि. २५ नोव्हेंबर रोजी ११ जणांवर संबधित पोलीस स्टेशनमध्ये ५३/१ अंतर्गत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. पीएमआरडीएकडून बांधकामांवर केलेल्या कारवाईबाबत काहीही हरकत नाही, परंतु पीएमआरडीएच्या हद्दीत असणाऱ्या अनधिकृत बांधकामांबाबत असंख्य तक्रारी दाखल असताना केवळ काही विशिष्ट बांधकामांवरच कारवाई करून गुन्हे केले जात आहेत.

पीएमआरडीएच्या हद्दीत असणाऱ्या सर्वच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून ५३/१ अंतर्गत प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमानुसार गुन्हे दाखल करावे असे निवेदनात नमूद केले आहे. बँकचे कर्ज काढून सामान्य नागरिकांनी घरांचे बांधकामे केली आहेत. आधीच मागील आठ महिन्यांपासून कोरोनामुळे सामान्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली असताना तक्रारदारांच्या तक्रारीवरून पीएमआरडीएकडून बांधकामांवर कारवाई केली जात आहे. तक्रारदारांनी वैयक्तिक लाभापोटी तक्रार केली असून पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी अशा तक्रारीची दखल घेऊन कारवाई करणे योग्य नाही. कारवाई करायचीच असेल तर पीएमआरडीएच्या हद्दीत येणाऱ्या सर्वच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी असेही दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदरील बांधकामाबाबत तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली असल्याचे पीएमआरडीएच्या संबधित अधिकाऱ्यांना सांगितले

दि. २४ नोव्हेंबर २०२० रोजी राज्य शासनाने वाघोली गाव पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. त्यामुळे पीएमआडीएला बांधकाम पडण्याचा कायदेशीर अधिकार नाही. वाघोली गाव महापालिकेच्या की पीएमआडीएच्या हद्दीत याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

– राजेंद्र अण्णा सातव पाटील (मा. उपसरपंच, वाघोली)

 

 

पीएमआडीएच्या हद्दीमधील हजारोंच्या संख्येत तक्रारी असताना केवळ विशिष्ट बांधकामांवर कारवाई करून गुन्हे दाखल केले जात आहेत. वैयक्तिक फायद्यासाठी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करणे अन्यायकारक आहे. पीएमआडीएने हद्दीत असणाऱ्या सर्वच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी. याप्रकरणी न्यायालयाकडे धाव घेणार आहे.

– संदीप कटके (अध्यक्ष – जी.के. फाउंडेशन)

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.