एटीएसकडून ८५ बांगलादेशी नागरिकांना भारतीय पासपोर्ट मिळवून देणाऱ्या टोळीला अटक

मुंबई : दहशतवादविरोधी पथकाच्या काळाचौकी टिमला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान ४ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मुंबईत ८५ बांगलादेशी नागरिकांना अनधिकृतपणे बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक व पासपोर्ट मिळवून देणाऱ्या ८ जणांच्या टोळीला अटक केली आहे. दहशतवादी विरोधी पथकाने शिवडी परिसरातून २९ नोव्हेंबर रोजी अक्रम नूर नबी अलाउद्दीन शेख या बांगलादेशी आरोपीला अटक केली होती. या आरोपीच्या झालेल्या चौकशीदरम्यान या मागे एक मोठे रॅकेट मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील मुंब्रा परिसरात कार्यरत असल्याचं समोर आलं होतं.

अक्रम नूर नबी ओलाउद्दीन शेख (वय २८) मोहम्मद सोहेल अब्दुल सुभान शेख (वय ३३), अब्दुलखैर समसुलहक शेख (४२), अबुल हाशम ऊर्फ अब्दुल काशम शेख (वय २६) अशा ४ बांगलादेशी नागरिकांसह त्यांना मदत करणाऱ्या रफिक रहमतुल्ला सय्यद (वय ४२), इद्रिस मोहम्मद शेख, नितीन निकम आणि अविन केदारे त्यानंही अटक केली आहे. अक्रमकडे ३ मोबाइल, ७ बांगलादेशी सिमकार्ड, १८ भारतीय सिमकार्ड व विविध बँकांचे ८ एटीएम कार्ड तसेच कागदपत्रांसह ८ लाख ३० हजार ७३० रुपये सापडले. तर रफिक शेखकडे वेगवेगळ्या तीन पॅनकार्डसह वाहन चालक परवाना, डेबिट कार्ड, दोन मोबाइल फोन आणि ४४६ पासपोर्टधारकांचे अर्ज आणि अर्ज नोंदणी डायरी जप्त करण्यात केली.

अक्रम नूर नबी ओलाउद्दीन शेख या बांगलादेशी नागरिकाला २९ नोव्हेंंबर रोजी शिवडीतून अटक करण्यात आली. तो घुसखोरीच्या मार्गाने भारतात आला. येथे त्याच्या वास्तव्यासाठी वडाळ्यातील नूर नवी आणि मुंब्रा येथील रफिक शेख यांच्यामार्फत आधारकार्ड, पॅनकार्ड व भारतीय पासपोर्ट मिळाले. त्यानुसार शेख व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करत तपास सुरू केला. तपासादरम्यान रफिक रहमतुल्ला सय्यद याला मुंब्रा येथून अटक करण्यात आली. तो २०१३ पासून पासपोर्ट दलाल म्हणून काम करतो. त्याने आतापर्यंत ४४६ लोकांचे पासपोर्ट काढून दिले आहेत. यामध्ये ८५ बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.