कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी

 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. प्रत्येक दिवशी एका सत्रात १०० ते २०० लोकांचे लसीकरण, लस दिल्यानंतर प्रतिकूल परिणाम पाहण्यासाठी ३० मिनिटे देखरेख आणि एका वेळी एकाच व्यक्तीला लस, अशा प्रमुख मार्गदर्शक सूचनांचा त्यांत समावेश आहे.

केंद्राने राज्यांना अलीकडेच मार्गदर्शक सूचना पाठवल्या आहेत. लसीकरणाच्या ठिकाणी केवळ नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांचे प्राधान्यक्रमानुसार लसीकरण केले जाईल आणि लसीकरणस्थळी नोंदणी करण्याची कुठलीही तरतूद असणार नाही, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. नोंदणी केलेल्या लाभार्थीच्या लसीकरणासाठी ‘कोविड व्हॅक्सिन इन्टेलिजन्स नेटवर्क (को-विन)’ या डिजिटल यंत्रणेचा वापर करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सुमारे ३० कोटी लोकांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

कोविड-१९च्या वेगवेगळ्या लसींची सरमिसळ होऊ नये, यासाठी शक्यतो एका उत्पादकाची लस एका जिल्ह्य़ासाठी दिली जावी, असे राज्यांना सांगण्यात आले आहे.

लसवाहक, लसीच्या कुप्या वा शीतपेटय़ा यांचा सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, असे ‘करोना लसीकरण मोहीम मार्गदर्शक तत्त्वां’मध्ये नमूद करण्यात आले आहे. लाभार्थी लसीकरणासाठी केंद्रावर येईपर्यंत, लस आणि तीव्रता कमी करणारे द्रव (डायल्युअंट) हे लसवाहकामध्ये (व्हॅक्सिन कॅरिअर) झाकणबंद अवस्थेत ठेवले जावे, असेही सांगण्यात आले आहे.

लशीच्या कुप्यांवर संरक्षण करणारे ‘व्हीव्हीएम’ आणि लेबलवर वैधता मुदत कदाचित नमूद केलेली नसेल, मात्र त्यामुळे या लशीचा वापर करता येणार नाही, असे नव्हे. सत्राच्या अखेरीस सर्व शीतपेटय़ांसह लस वाहक आणि लसीच्या न उघडलेल्या कुप्या वितरण करणाऱ्या केंद्राकडे परत पाठवल्या जाव्यात,’ असेही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

लसीकरणाचा फायदा आणि लशीबद्द्लचे गैरसमज याबाबतच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्यांनी सर्वसमावेशक संपर्क यंत्रणा आणि सामाजिक जागृती धोरण आखावे, असेही केंद्राने राज्यांना सांगितले आहे.

* लसीकरण कर्मचारी चमूमध्ये पाच जणांचा समावेश आवश्यक.

* आरोग्य कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक आदींचे सर्वप्रथम लसीकरण. लशीच्या उपलब्धतेनुसार इतरांचे लसीकरण.

* लसीकरणासाठीच्या प्राधान्य वयोगटांमध्ये ५० वर्षांवरील नागरिकांचे ५० ते ६० आणि ६० वर्षांपुढील असे दोन गट.

* प्राधान्य वयोगट निश्चित करण्यासाठी अलीकडच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीच्या मतदारयाद्यांचा आधार.

नावनोंदणी

लसीकरणासाठी लाभार्थ्यांने स्वत: ‘कोविड व्हॅक्सिन इन्टेलिजन्स नेटवर्क (को-विन)’ या यंत्रणेवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी छायाचित्र असलेल्या १२ ओळखपत्रांची यादी देण्यात आली आहे. त्यात मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तिवेतन कागदपत्रे इत्यादींचा समावेश आहे.

करोना चाचणीदरात आणखी २०० रुपये कपात

राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संशयितांच्या जास्तीत जास्त चाचण्या व्हाव्यात, यासाठी खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या करोना चाचणीचे दर आणखी २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता के वळ ७८० रुपयांमध्ये कोणत्याही खासगी प्रयोगशाळेत जाऊन करोनाची चाचणी करता येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.