हिंदी भाषा प्रचारात महाराष्ट्र, गुजरातचे मोठे योगदान – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : खुद्द हिंदी भाषिकांपेक्षा महाराष्ट्र व गुजरात या राज्यांनी हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराचे फार मोठे कार्य केले असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

आज हिंदी भाषा सुरीनाम, मॉरीशस, फिजी यांसह अनेक देशात बोलली व समजली जाते. त्यामुळे हिंदी एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे असे त्यांनी सांगितले.

हिंदी भाषेतील प्रसिध्द हास्य-व्यंग लेखकांच्या लेखांचे संकलन असलेल्या ‘बता दूँ क्या’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते मंगळवारी राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल म्हणाले, हास्य व्यंग लिखाण हे एखाद्या टॉनिक प्रमाणे असून ते हलकेच आनंद देताना वाचकांना अंतर्मुख करते. देशातील सर्व भाषा एकमेकांच्या भगिनी असून हिंदी भाषिकांनी मराठी भाषेचे ज्ञान प्राप्त करावे, अशीही सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

ज्येष्ठ पत्रकार डॉ. वागीश सारस्वत तसेच संपादक डॉ. प्रमोद पांडेय यांनी पुस्तकाची भूमिका स्पष्ट केली. कवयित्री आभा सूचक यांनी हिंदी अकादमी, मुंबईच्या कार्याची माहिती दिली. आर. के. पब्लिकेशनतर्फे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.

‘बता दूँ क्या’ या पुस्तकामध्ये डॉ. ज्ञान चतुर्वेदी, डॉ. हरीश नवल, डॉ. सुधीश पचौरी, श्री. संजीव निगम, श्री. सुभाष काबरा, श्री. सुधीर ओखदे, श्री. शशांक दुबे, श्री. विवेक रंजन श्रीवास्तव, डॉ. वागीश सारस्वत, श्रीमती मीना अरोडा, डॉ. पूजा कौशिक, डॉ. प्रमोद पांडेय, श्री. धर्मपाल महेंद्र जैन व देवेंद्र कुमार भारद्वाज यांच्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.