‘मॅको’ बँकेची व्याप्ती वाढविण्यासाठी सहकार्य करणार – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई : दि महाराष्ट्र मंत्रालय ॲन्ड अलाईड ऑफिसेस को-ऑप. बँक लि. मुंबई च्या सभासदांचे सभासदत्व कायम रहावे आणि बँकेची व्याप्ती वाढावी यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

 

मंत्रालयात दि महाराष्ट्र मंत्रालय ॲन्ड अलाईड ऑफिसेस को-ऑप बँक लि. मुंबई या बँकेच्या मंत्रालय आवारातील एटीएम मशीन आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सहकार मंत्री म्हणाले, दि महाराष्ट्र मंत्रालय ॲन्ड अलाईड ऑफिसेस को-ऑप बँक लि. मुंबई ही शासकीय कर्मचाऱ्यांची 91 वर्षाची देदिप्यमान उज्ज्वल परंपरा असलेली एकमेव अग्रणी बँक असून शासनाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वित्तीय गरजा भागविण्यासाठी कार्यरत आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना बँकेच्या आर्थिक सुविधा सहज उपलब्ध होण्यासाठी मंत्रालय परिसरातील एटीएम मशीन उपयुक्त ठरेल आणि मोबाईल ॲपमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेळेनुसार सेवा उपलब्ध होईल. कामानिमित्त मंत्रालयात राज्यातील विविध भागातून नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यांना सुद्धा या एटीएम मशीनचा उपयोग होईल, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

 

बँकेचे अध्यक्ष प्रमोद पंडित म्हणाले, बँकेचे खेळते भांडवल 322 कोटी 73 लाख इतके असून बँकेला ऑडीट वर्गात सतत ‘अ’ दर्जा मिळालेला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्तम सेवा देणारी ही बँक असून या बँकेमध्ये मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व्हावे आणि शाखा वाढविण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती श्री.पंडित यांनी केली.

 

दरम्यान बँकेच्या दिनदर्श‍िकेचे उद्घाटनही सहकार मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष भारत वानखेडे, संचालक भास्कर बनसोडे, श्रीमती मंगल नाखवा, शिवाजी चव्हाण, एकनाथ जाधव, संजय कदम, मनिष पाटील, हेमंत लेदाडे, सुनिल खाडे, श्रीमती पुजा उदावंत, भगवान पाटील, समीर तुळसकर तसेच मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.