कर्जत-जामखेड पोलिसांना मिळालेली नवी वाहने गुन्हेगारी रोखण्यास उपयुक्त ठरतील – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई: कर्जत-जामखेड पोलीस दलासाठी एकात्मिक विकास संस्थेमार्फत सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मिळालेली वाहने या दोन्ही तालुक्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम होऊन गुन्हेगारी रोखण्यास तसेच सर्वसामान्यांना, माता भगिनींना दिलासा देण्यासाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे व्यक्त केला.
कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत कर्जत-जामखेड येथील पोलीस बांधवांना देण्यात येणाऱ्या वाहनांचा लोकार्पण सोहळा आज मंत्रालय येथे संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, एडीजी श्री. जगन्नाथन, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले, हा अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम असून कर्जत-जामखेडचे तरुण तडफदार आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेने साकार होत आहे. या वाहनांमुळे पोलीस दलास अधिक बळ प्राप्त होऊन गस्तीसाठी ही वाहने उपयोगी पडतील. राज्यातील इतर आमदारांनीदेखील अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत व आपल्या मतदारसंघात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीकोनातून पोलीस दल बळकटीकरणात पुढाकार घ्यावा.
आमदार रोहित पवार यांच्या एकात्मिक विकास संस्थेच्या वतीने पोलिसांसाठी दोन टाटा योद्धा जीप व चार बजाज मोटर सायकलचे लोकार्पण करण्यात आले. कर्जत व जामखेड पोलीस स्टेशन हद्द भौगोलिकदृष्ट्या मोठी आहे. चार जिल्ह्यांच्या सीमा या दोन तालुक्यांना आहेत. तसेच या भागात शाळा व महाविद्यालय जास्त असून शाळेमध्ये येणाऱ्या मुलींची संख्याही लक्षणीय आहे. दोन्ही तालुक्याची हद्द मोठी असल्यामुळे येणाऱ्या अडीअडचणींवर मात करुन गस्त घालणे सोयीचे होईल यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे ही वाहने देण्यात आल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. या पुढेही माता भगिनींच्या रक्षणासाठी पोलीस दलाला मदत केली जाईल असेही ते म्हणाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी वाहने दिल्याबद्दल एकात्मिक विकास संस्थेचे तसेच आमदार रोहित पवार यांचे आभार मानले. या वाहनांचा उपयोग गस्त वाढविण्यासाठी तसेच मोटार सायकलचा उपयोग छोट्या छोट्या गल्ली मोहल्ल्यातून सहजतेने पोहोचण्यासाठी महिलांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षितेसाठी करण्यात येईल असे सांगितले. कर्जत व जामखेड तालुक्यात भरोसा सेलची सुरुवात केली असून तक्रारदारांना विश्वसनीय व तत्पर सेवा देण्यात येईल असे सांगितले.
या कार्यक्रमास पोलीस उप विभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव तसेच जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव उपस्थित होते.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!