कोल्हापूरमध्ये गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश! , स्टिंग ऑपरेशनमध्ये डॉक्टर जाळ्यात

कोल्हापूर: स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग चाचणी करण्यावर कायद्यानं बंदी आहे. परंतु कोल्हापूर  जिल्ह्यात गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश झाला आहे. पुरोगामी जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये गर्भलिंग निदानाचं एक धक्कादायक वास्तव उघडकीस आल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात मातृसेवा हॉस्पिटल आहे. अरविंद कांबळे हा 55 वर्षीय डॉक्टर हे हॉस्पिटल चालवतो. पण या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान केलं जात असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्यांना होता. त्यामुळे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळपासून या हॉस्पिटलमध्ये एक स्टिंग ऑपरेशन राबवलं. त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये अरविंद कांबळे हा डॉक्टर अलगदपणे जाळ्यात सापडला. त्यानं सोनोग्राफीसाठी 20 हजार रुपये घेतल्याचंही स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झालं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे २०१७ साली हा डॉक्टर गर्भलिंग निदान करत असल्याचे उघड झालं होतं. त्याच्यावर कारवाई करून त्याच्या रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सील करण्यात आलं होतं. कारवाईनंतरही सोनोग्राफी मशीनचं सील काढून डॉ. कांबळे यानं गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा सुरूच ठेवला होता. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या गीता हसुरकर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आज स्टिंग ऑपरेशन केलं.कांबळे यांनं २० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर गर्भलिंगनिदानही केलं. त्यानंतर पन्हाळा पोलिसांनी आरोपी डॉक्टरला रंगेहात ताब्यात घेतलं. कांबळे यांनं किती महिलांचं गर्भलिंगनिदान केलं आहे, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि बेळगाव सीमा भागात अजूनही गर्भलिंग करणाऱ्यांचे रॅकेट असल्याचा संशय सामाजिक कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं. यापूर्वीही कोल्हापूर जिल्ह्यात अनेक वेळा चालत्या अॅम्ब्युलन्समध्ये गर्भलिंग निदान केले जात असल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे गर्भलिंग निदान करणाऱ्या अशा डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी आता कोल्हापूरकरांकडून केली जात आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.