चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराकडून बांगलादेशी तरुणीची हत्या

नवी मुंबई :  चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने कळंबोली परिसरात राहणाऱ्या बांगलादेशी २६ वर्षीय तरुणीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे विशेष म्हणजे प्रियकर हा देखील बांगलादेशी आहे. अटक केलेला २४ वर्षीय तरूण हा तिच्यासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होता.

दरम्यान रीनाचे बाहेर आणखी एका व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध असून ती मला फसवत होती. त्यामुळे आपण रागाच्या भरात तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर फ्लॅट बंद करून आपण पळ काढला, अशी कबुली रीनाच्या प्रियकराने पोलिसांना दिली.

कळंबोली येथील फ्लॅटमध्ये लिपी सागर शेख उर्फ रीना शेख हिचा मृतदेह ७ डिसेंबरला पोलिसांना मिळाला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.तीन आठवड्यांपूर्वी तिची गळा आवळून हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर मारेकरी फ्लॅटचा दरवाजा बंद करून पसार झाला होता. लिपी सागर शेख असे तरुणीचे नाव होते. ती बेकायदा वास्तव्यास होती. बांगलादेशातील तिच्या दोन सहकारी महिलांसोबत ती फ्लॅटमध्ये राहत होती. नवी मुंबईत त्या नोकरीला होत्या.

लॉकडाऊनच्या काळात या तिघींच्या नोकऱ्या गेल्याने त्या बेरोजगार होत्या. रीनाच्या दोन्ही मैत्रिणी बांगलादेशला परतल्या होत्या. तेव्हापासून रीना फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. काही दिवसांपूर्वी रीनाच्या मैत्रिणी नोकरीसाठी नवी मुंबईत परतल्या. तेव्हा फ्लॅट बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रीनाला अनेक फोन करूनही तिने उत्तर दिले नाही. त्यानंतर रीनाच्या मैत्रिणींनी फ्लॅटच्या मालकाला फोन करून त्याच्याकडून फ्लॅटची चावी मागून घेतली. तेव्हा घरमालकाने रीना अजूनही फ्लॅटमध्येच राहत असल्याचे सांगत चावी तिच्याकडेच असल्याचे म्हटले. अखेर या फ्लॅटच्या ब्रोकरकडे असलेल्या डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने फ्लॅट उघडण्यात आला.
तेव्हा रीनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
 त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. अधिक चौकशी केली असता, लिपी ही बांगलादेशी व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानेच तिची हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तपास केला असता, संशयित आरोपी बांगलादेशला परतला नसून, तो मुंबईत असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. पोलिसांनी पथके रवाना केली. तसेच त्याला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिचे अन्य व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यावरून भांडण झाले. त्याच रागात त्याने तिचा गळा आवळून हत्या केली, असे त्याने पोलिसांना सांगितले.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.