विकासप्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : पुणे आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे घेतला. विकासप्रकल्प पूर्ण करताना कालबद्ध मर्यादेत तो पूर्ण करावा, जेणेकरुन नागरिकांना त्याचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकांना उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अपर मुख्य सचिव  आशिषकुमार सिंह यावेळी उपस्थित होते.

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणामार्फत 960 कोटी रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. एकूण निधीपैकी सुमारे 53 टक्के निधी मेट्रोसाठी खर्च करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्राधिकरणाच्या हद्दीतील प्रकल्पांसाठी लागणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन करण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय यावेळी झाला. त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व निधीतून प्रकल्प करण्याबाबत नियोजन करण्यासाठी सुकाणू समितीदेखील नेमण्याचा यावेळी निर्णय झाला. यावेळी प्राधिकरणाचे महानगर आयुक्त सुहास दिवसे यांनी सादरीकरण केले.

नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या कामांचे सादरीकरण महानगर आयुक्त शीतल उगले यांनी केले. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. सध्या प्राधिकरणामार्फत सुमारे 1500 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प सुरु असून त्यात विकासकामांसोबतच सौंदर्यीकरणावरही भर देण्यात येत असल्याचे, नागपूर येथे मुलींसाठी संत चोखामेळा वसतिगृह उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सादरीकरणादरम्यान सांगितले.

बैठकीस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवासन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.