चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या; पाच मुले झाली अनाथ
लातूर :पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा खून करुन स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना औसा तालुक्यातील आशिव येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. ही घटना गुरुवारी (ता. १७) सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली आहे.
अनुराधा महादेव पारधे (वय ४०, रा.आशिव, ता.औसा), महादेव प्रकाश पारधी (वय ४५, रा. मंगरूळ, ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद) अशी मृत पत्नी व पतीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आशिव येथील धर्मा कांबळे यांची मुलगी अनुराधा हिचा विवाह २० वर्षांपूर्वी तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील महादेव पारधे यांच्याशी झाला होता.मात्र, दोन वर्षांपासून पती- पत्नीत सतत वाद होऊन भांडणे होत असत . त्यामुळे पत्नी अनुराधा ही आपल्या मुलांसह माहेरी येऊन राहू लागली. तसेच त्यांचा पतीही आशिव येथे रहायला आला होता. तो दररोज तुळजापूर येथे कामासाठी जात असत.
गेल्या अनेक दिवसांपासून महादेव हा अनुराधाच्या चारित्र्यावर संशय घेत सतत मारहाण करायचा. यातूनच धारदार शस्त्राने अनुराधाचा गळा चिरला. त्यात त्या जागीच मृत्यूमुखी पडल्या. दरम्यान, आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाल्याने महादेव यानेही राहत्या घरातच पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या लाकडी आढुला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी मयत महादेव याचा लहान मुलगा अर्णव याने आई- वडिलांचे मृतदेह पाहून आजोबांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले, सहायक पोलिस निरीक्षक संदीप भारती, पोलिस उपनिरीक्षक महेश मुळीक, बीट अंमलदार कमाल शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी भादा येथील पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भारती हे करित आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!