बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी सुरू; दोषींवर कठोर कारवाई – सुनिल केदार

नागपूर : राज्यभर गाजत असलेल्या बोगस क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती राज्याचे दुग्ध विकास, पशू संवर्धन व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी मुंबई येथे बुधवारी दिली.

राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या घोषणेच्या वेळी बोगस प्रमाणपत्रासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केदार म्हणाले, या गंभीर प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे. बोगस प्रमाणपत्र देणारे जितके दोषी आहेत, तितकेच त्याचा उपयोग करणारेही दोषी आहेत.

त्यामुळे सरकार कुणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणात दोषी आढळून येणाऱ्या क्रीडा अधिकारी तसेच खेळाडूंवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाच टक्के आरक्षणाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने अनेकांनी बनावट प्रमाणपत्र तयार करून शासकीय नोकऱ्या लाटल्या आहेत. या प्रकरणाचा भंडाफोड झाल्यानंतर ठिकठिकाणी अनेक वरिष्ठ क्रीडा अधिकारी व प्रमुख सुत्रधारांना अटक करण्यात आलेली आहे. नागपुरातही आतापर्यंत एकूण दहा जणांना अटक झालेली आहे.

यात माजी क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर व क्रीडा अधिकारी महेश पडोळेचा समावेश आहे. या प्रकरणात अजूनही बडे मासे पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांच्याही मुसक्या लवकरच आवळल्या जाण्याची शक्यता आहे. दैनिक ‘सकाळ’ने या गंभीर प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.