मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड

नवी दिल्ली : काँग्रेसचे कामगार नेते अशोक उर्फ भाई जगताप  हे आता मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष असणार आहेत. तर चरणसिंह सप्रा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्षपद असणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीला वर्ष राहिले असताना मुंबई काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या नव्या कार्यकारिणीला मंजुरी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजी होती. त्यामुळे हा नवा बदल करण्यात आला आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक जणांची लॉबिंग सुरु होते. यामध्ये वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, अस्लम शेख यांचा समावेश होता. मात्र, भाई जगताप यांनी बाजी मारली आहे. असे असले तरी अन्य इच्छुकांनाही कार्यकारणीत स्थान देऊन त्यांचे समाधान करण्यात आले आहे.

मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद २०१९ पासून माजी खासदार व ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांच्याकडे होते. मात्र त्यांच्याबद्दल पक्षातून सातत्याने नाराजी व्यक्त होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यात अनेक नावे शर्यतीत होती. मात्र, जगताप यांनी बाजी मारली आहे. जगताप यांच्यासाठी ही जबाबदारी निश्चितच सोपी नसेल. मुंबई पालिका निवडणुकीसाठी आतापासूनच सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यादृष्टीने जगताप यांना मुंबईत पक्षाची विस्कटलेली घडी सर्वप्रथम नीट करावी लागणार आहे.

भाई जगताप यांच्या गाठीशी दांडगा अनुभव आहे. पक्षातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचा फायदा निश्चितच काँग्रेसला होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. जगताप यांच्यासोबत अनुभवी टीमही देण्यात आली आहे. चरणजीत सिंग सप्रा यांची कार्याध्यक्षपदी, माजी मंत्री नसीम खान यांची प्रचार समिती प्रमुखपदी तर सुरेश शेट्टी यांची जाहीरनामा प्रमुखपदी वर्णी लागली आहे. मावळते अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिलेल्या योगदानाबद्दल पक्षाने त्यांचे आभार मानले आहेत व यापुढेही मुंबई काँग्रेसला आपले मार्गदर्शन लाभेल, अशी अपेक्षा पक्षाने व्यक्त केली आहे.

प्रचार समितीचे, अध्यक्ष म्हणून मोहम्मद आरिफ नसिम खान,  समन्वय समिती, अध्यक्ष म्हणून अमरजितसिंह मनहास, तर जाहीरनामा आणि प्रकाशन समिती अध्यक्ष सुरेश शेट्टी यांना स्थान देण्यात आले आहे. मुंबईचे प्रभारी म्हणून चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे कामगिरी सोपविण्यात आली आहे. तपासणी आणि रणनीती समिती, सचिव म्हणून गणेश यादव यांची नियुक्ती केली आहे. तर माजी खासादार प्रिया दत्त, अमिन पटेल, जनेत डिसुझा, उपेंद्र दोशी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत भाई जगताप?

अशोक जगताप यांची भाई जगताप या नावाने ओळख
भाई जगताप काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषद आमदार.
जगताप यांच्या आमदारकीची दुसरी टर्म
भाई जगताप याआधी विधानसभेवरही निवडून गेले होते, मात्र गेल्या निवडणुकीत पराभव झाला होता.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.