गोव्यातून बेकायदा विक्रीसाठी आणलेली ५६ लाखांची दारू केली जप्त

पुणे : नाताळ आणि नवीन वर्षासाठी गोव्यातून विक्रीसाठी बेकायदा आणल्या जात असलेला ५६ लाख ४८ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला. त्यामध्ये विविध ब्रॅंडचे विदेशी मद्य व बिअरचे ३६० बॉक्‍सचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री फलटण रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

गोव्यातून महाराष्ट्रामध्ये अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक क्रमांक दोनच्या निरीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री बारामती तालुक्‍यामध्ये विविध तीन ठिकाणी सापळे लावले होते. त्यानुसार फलटणमार्गे सांगवी येथून बारामतीच्या दिशेने एक ट्रक भरधाव जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानुसार पथकाने ट्रकचा पाठलाग करून काही अंतरावर ट्रक थांबविला. चालकाकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर ट्रकची तपासणी केली. तेव्हा ट्रकमध्ये कारखान्यातील मळीपासून तयार केलेले कंपोस्ट खत असल्याचे पहिल्यांदा निदर्शनास आले.

त्यानंतर पथकाने अधिक तपासणी केली, त्यावेळी कंपोस्ट खताच्या दोन फूट खाली कागदी बॉक्‍स आढळून आले. त्यामध्ये परदेशी मद्याच्या ७१० बॉक्‍स व बिअरचे १९० बॉक्‍स असे एकूण ३६० बॉक्‍स आढळून आले. त्यामध्ये ४४ लाख ४८ हजार रुपये किमतीचे मद्य, तर १२ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ५६ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. ट्रकच्या वाहनचालकासह तिघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. मागील काही वर्षांपासून गोवा राज्यातून येणारे अवैध मद्य विक्रीवर करण्यात आलेली ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय जाधव, संजय पाटील, भरारी पथकाचे निरीक्षक अनिल बिराजदार, विजय मनाळे, दुय्यम निरीक्षक विकास थोरात, डी. बी. पाटील, विठ्ठल रसाळ, प्रशांत धाईंजे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.