“… तर 1000 कोटी रुपये खर्चून नवीन संसद भवनाचा थाट कशासाठी”

मुंबई : राजधानी दिल्लीत उभारण्यात येत असलेल्या नवीन संसद भवनाच्या इमारतीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकावर निशाणा साधला आहे. तसेच, लोकशाहीला संपवण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. अधिवेशन काळात संसद भवन गजबजलेले असते, पण आता संसदेचे हिवाळी अधिवेशनही मोदी सरकारने कोरोनाच्या नावाखाली रद्द केले. अधिवेशने, चर्चा होणारच नसतील तर 1000 कोटी खर्च करून नव्या संसद भवनाचा घाट आणि थाट कशासाठी ? असा प्रश्न संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून विचारला आहे.

सामनाच्या रोखठोकमधून सदर लिहिताना राऊत म्हणाले की, संसद सध्या बंद पडली आहे. संसदेत काम नाही, पण 1000 कोटींचे नवे संसद भवन न्यायालयाचा आदेश डावलून उभारले जात आहे. देशात रशियासारखी स्थिती निर्माण झाल्याचे पृथ्वीराज चव्हाणांसारखे नेते सांगतात. पुतिन यांनी सर्वसत्ताधीश होण्यासाठी कायदेच बदलले. संसदेचे महत्त्व कमी केले. विरोधकांना खतम केले. ब्रिटनमध्ये असे कधीच घडणार नाही! का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ब्रिटनचे पंतप्रधान चार आठवडे आजारी हाते. तो काळ सोडला तर ब्रिटनच्या संसदेनेही प्रश्नोत्तराचा तास कधी टाळला नाही. जगातील 105 देशांत संसदीय लोकशाही असून दुर्दैवाने त्यापैकी भारत आणि रशिया या दोनच देशांनी संसदेचे अधिवेशन घेण्याचे टाळले आहे, अशी माहितीही त्यांनी सांगितली.

‘आपल्या देशात लोकशाही धोक्यात असल्याची ओरड सदा सर्वकाळ सुरूच असते. पंडित नेहरूंपासून ते आजच्या मोदींपर्यंत. तरीही लोकशाही धोक्यात नसून लोकशाहीचे अजीर्णच झाले आहे असेही अनेकांना वाटते. त्या अनेकांतले एक प्रमुख म्हणजे नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत. श्री. कांत यांनी या आपल्या देशात ‘टू मच’ म्हणजे अती लोकशाही असल्यामुळे आर्थिक सुधारणा कठीण होऊन जात असल्याचे म्हटले आहे. महात्मा गांधींवर आणि पंडित नेहरूंवर एकाधिकारशाहीचे आरोप झाले, तसे आरोप आता मोदींवर होत आहेत. अमेरिकेतील लोकशाहीचे नेहमी कौतुक होते. त्या अमेरिकेतही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले प्रे. ट्रम्प पराभव मानायला तयार नव्हते व सत्ता सोडणार नाही अशी त्यांची पोरकट भूमिका होती. पण आता ते जात आहेत. अमेरिकेत हे असे लोकशाहीचे अजीर्ण झाले तेथे हिंदुस्थानसारख्या देशाचे काय? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

‘पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत नवे संसद भवन बांधायला घेतले आहे. या संसद भवनाचे भूमिपूजनही पंतप्रधानांनी केले. अधिवेशन काळात संसद भवन गजबजलेले असते, पण आता संसदेचे हिवाळी अधिवेशनही मोदी सरकारने कोरोनाच्या नावाखाली रद्द केले. अधिवेशने, चर्चा होणारच नसतील तर 1000 कोटी खर्च करून नव्या संसद भवनाचा घाट आणि थाट कशासाठी, हा प्रश्न आहे.  आधीच्या राज्यकर्त्यांचे नामोनिशाण मिटवून टाकायचे, नेहरू, शास्त्री, इंदिराजी, राजीव गांधी, मनमोहन सिंग, डॉ. आंबेडकरांपासून लोहियांपर्यंत सगळ्यांच्या आठवणी संपवायच्या व इतिहासाच्या पाऊलखुणा, ठसे संपवायचे व स्वतःचीच प्रतिमा निर्माण करणारे नवे दस्तऐवज, इमारती उभ्या करायच्या हा लोकशाहीचाच अतिरेक आहे असे कोणालाच वाटत नाही’ असं परखड मतही राऊत यांनी व्यक्त केलं.

‘लोकशाहीचा अतिरेक सुरू आहे असे नीती आयोगाचे सीईओ सांगतात, पण जेथे संसदेचे दरवाजेच बंद केले तेथे लोकशाही कुठे राहिली? लोकशाही जिवंत असती तर दिल्लीच्या वेशीवर बसून राहिलेल्या शेतकऱ्यांशी सरळ संवाद झाला असता. त्यांचे ऐकले जात नाही व संसदेत त्यावर चर्चा घडू दिली जात नाही. ज्या ब्रिटनकडून आपण लोकशाही घेतली तेथे असे घडत नाही. त्याच ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे जानेवारीच्या सोहळ्यास दिल्लीत प्रमुख पाहुणे म्हणून येत आहेत. त्यांना आपले बंद पाडलेले पार्लमेंट दाखवणार काय? असा सवालही राऊत यांनी विचारला.

‘ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन येत आहेत म्हणून त्याच ग्रेट ब्रिटनचे गाजलेले पंतप्रधान चर्चिल यांचे स्मरण झाले. चर्चिल हे राजकारण सत्तेचे आहे, असे मानणारे असले तरी ही सत्ता पार्लमेंटकडून आपल्याला मिळते. चर्चिल हे आपल्या विरोधकांवर मात करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत, पण पराभूत झालेल्या विरोधकांशी क्षुद्रपणे वागत नसत हे महत्त्वाचे. मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चर्चिल यांचा आदर्श याबाबतीत ठेवला पाहिजे. संसदेचे महत्त्व ठेवले तरच लोकशाहीचा झेंडा फडकत राहील. मोदी यांना आज कोणाचेही आव्हान नाही. त्यामुळे त्यांना पुतिनप्रमाणे वागण्याची गरज नाही. त्यांनी चर्चिल व जॉन्सनचाच आदर्श बाळगायला हवा’ असा सल्लावजा टोलाही राऊत यांनी पंतप्रधानांना लगावला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.