मुख्यमंत्री ठाकरे आज 1 वाजता साधणार राज्यातील जनतेशी संवाद
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोना आणि नववर्षाचं स्वागत यासोबतच नाताळ यासंदर्भात मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर काही नवी नियमावली जाहीर होणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
एकीकडे कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. अशात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात पेटून उठले आहेत. त्यामुळे या सगळ्यावरून काही मोठा निर्णय घेतला जाणार आहे का हे पाहणं आता जनतेसाठी महत्त्वाचं असणार आहे.
कोरोनाचा वाढता धोका
खरंतर, राज्यात कोरोनाची लाट अद्यापही कायम आहे. नियम जरी शिथील केले असले तरी जीवघेण्या संसर्गाचा धोका आणखी वाढत आहे. अशात आता रेल्वे सुरू होण्यावर भर देण्यात येत असल्यामुळे भविष्यात होणारी गर्दी कशी टाळता येईल. इतकंच नाही तर कोरोनाच्या लसींसदर्भात सरकारचं काम कुठपर्यंत आलं आहे. यावरही मुख्यमंत्री महत्त्वाची माहिती देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मेट्रो कारशेडवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपली
गेल्या काही दिवसांपासून मेट्रो कारशेड हस्तांतरणावरुन विरोधक ठाकरे सरकारला घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आजच्या संवादामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना काय उत्तर देणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मेट्रो कारशेड कांजूर मार्ग इथे उभारण्यास न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुढे न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊ नये म्हणून मेट्रो 3 चे कार शेड बांद्रा कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेनसाठीच्या प्रस्तावित जागेवर उभारता येते का या पर्यायाची चाचपणी करण्यात येत आहे. राज्य सरकार याबाबत चाचपणी करत आहे. मेट्रो कार शेडबाबत कांजूर मार्ग येथील जागेच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींचा पत्राद्वारे संवाद
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्याने महाविकास आघाडीत अलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच शिवसेनेपाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र त्यावर सारवासारव करण्यास सुरुवात केली. सोनिया गांधींचं लेटर म्हणजे लेटरबाँब नाही, हा संवाद आहे, अशी सारवासारव दोन्ही काँग्रेसने केली आहे. पण दरम्यान, या संवादातून काय चर्चा झाली आणि यावर उद्धव ठाकरे विरोधकांना काय प्रत्युत्तर देणार याकडे राजकीय नेत्यांचं लक्ष असणार आहे
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!