कर्जदारांना हुलकावणी देण्यासाठी 15 वर्षांपूर्वीच्या मित्राचा खून, पिंपरी चिंचवड मधील घटना

पिंपरी चिंचवड : कर्जदारांना हुलकावणी देण्यासाठी एका व्यक्तीने 15 वर्षांपूर्वी एकाच कंपनीत काम करत असलेल्या मित्राचा खून केला. मृतदेह अर्धवट जाळला आणि तो मृतदेह आपलाच आहे असे भासवण्यासाठी चक्क 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘मी आत्महत्या करत आहे’ असे लिहून ठेवले. मात्र, पोलिसांनी त्याचा दिल्लीपर्यंत पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्या.

मेहबूब दस्तागिर शेख (रा. राजवाडेनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संदीप पुंडलिक माईनकर (रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मुंबई-बंगळुरू महामार्गावर बाणेर येथे उदनशाहवली दर्याच्या मोकळ्या जागेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. या व्यक्तीला हत्याराने भोकसून ठार मारले होते. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी ज्वलनशील पदार्थ टाकून जाळले होते. मृतदेह दर्याच्या भिंतीजवळ टाकण्यात आला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाचे शवविच्छेदन केले. दरम्यान, पोलिसांना मयत व्यक्तीच्या खिशात अर्धवट जळालेली एक चिठ्ठी सापडली. त्यात मयताचे मूळ नाव होते. मयताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध लावून याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला. संदीप माईनकर यांना दारूचे व्यसन होते. ते कुठेही फिरून मिळेल तिथे खाऊन कुठेही राहत होते. मयत संदीप वल्लभनगर येथील शिवभोजन थाळी केंद्रावर जेवण करत होते. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला तपासाला शिवभोजन थाळी केंद्राकडून सुरुवात केली. मात्र, त्यात पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही.

त्यानंतर पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या ठिकाणी मिळालेल्या वस्तूंच्या आधारे तपासाला सुरुवात केली. त्यात पोलिसांना ब्ल्यूटूथ, कपडे मिळाले होते. ब्ल्यूटूथचा तांत्रिक तपास घेऊन पोलिसांनी ब्ल्यूटूथच्या मालकाचा शोध सुरु केला. ब्ल्यूटूथचा मालक हा वाकड येथील असून तो मागील काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दाखल होती.

पोलिसांच्या संशयाची सुई मेहबूब शेख या बेपत्ता व्यक्तीवर आली. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडे शोध सुरु केला. मेहबूब याला दोन पत्नी असून त्याच्या पहिल्या पत्नीने तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. दुसरी पत्नी देखील बेपत्ता होती. मग पोलिसांनी या जोडीचा शोध सुरु केला. तांत्रिक मुद्द्यांवरून मेहबूब शेख हा दिल्ली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.हिंजवडी पोलिसांचे एक पथक थेट दिल्लीला रवाना झाले. दिल्ली येथे शोध घेतला असता तो तिथून कुठेतरी गेला होता. पोलिसांनी दिल्ली रेल्वे स्थानकावर पुण्याहून आलेल्या आणि पुण्याला गेलेल्या प्रवाशांची यादी तपासली. त्यात तो त्याच्या दुस-या पत्नीसोबत पुन्हा पुण्याला गेल्याचे समजले. पोलिसांनी दौंड रेल्वे स्थानकावर सापळा लावून मेहबूब याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याने मनीषा, रामदास, अश्रफ नावाच्या व्यक्तींकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले. ते त्याच्याकडे कर्ज परत देण्यासाठी वारंवार तगादा लावत होते. त्यांचा तगादा टाळण्यासाठी त्याने एका व्यक्तीचा खून करून तो आपलाच असल्याचे भासवून यातून सुटण्याचा डाव आखला. त्याने 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘मी कर्जबाजारी झालो असून मी माझा शेवट करीत आहे. माझी बॉडी ही बाणेर भागातच मिळेल’ असे लिहिले. तो स्टॅम्प पेपर स्वतःकडे ठेवला. मयत संदीप माईनकर आणि आरोपी 15 वर्षांपूर्वी हाफकिन कंपनीत एकत्र काम करत होते. त्यानंतर दोघांनी कंपनी सोडली. आरोपी मेहबूब याला त्याच्या कटासाठी सावज हवे होते. संदीप कुठेही फिरून जीवन जगतात. त्यांच्याबाबत विचारणारे कोणी नाही, त्यामुळे मेहबूब याने संदीप यांची निवड केली.

28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी मेहबूब आणि संदीप हाफकिन कंपनीच्या बाहेर भेटले. त्याने 15 वर्षांपूर्वीचा मित्र असलेल्या संदीप यांना त्याच्या वाकड येथील घरी नेले.घरी दोघांनी चहा घेतला. त्यानंतर मेहबूब आणि संदीप दुचाकीवरून बाणेरच्या दिशेने निघाले. त्यावेळी मेहबूब याने त्याच्यासोबत बॅग घेतली. मेहबूब याने संदीप यांना ठार मारले. मृतदेह अर्धवट जाळला आणि दर्याच्या भिंतीजवळ टाकून दुसऱ्या पत्नीसोबत पळ काढला. सुरुवातीला मेहबूब आणि त्याची पत्नी चार दिवस अजमेर येथे राहिले. त्यानंतर दिल्ली येथे काही दिवस राहिले. तिथून त्यांनी पुन्हा पुण्याकडे प्रस्थान केले. दरम्यान पोलिसांनी त्यांचा माग काढून दोघांना दौंड येथे गाठले. मृतदेहाजवळ सापडलेले ब्ल्यूटूथ आरोपीच्या मोबाईल फोनला कनेक्ट केले असता ते लगेच कनेक्ट झाले. तसेच त्या ब्ल्यूटूथचा चार्जर त्याच्या बॅगमध्ये सापडला. पोलिसांनी आरोपी मेहबूब याला अटक केली आहे.

सदरचा कामगिरी पिपरी चिचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ,परिमंडळ दोनचे पोलीस उप-आयुक्त आनंद भोईटे साो, गुन्हे शाखेचे सहा.पोलीस आयुक्त आर आर पाटील,वाकड विभागाचे सहा.पोलीस आयुक्त गणेश बिरादार सो,यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  बाळकृष्ण सावंत,पो.निरी अजय जोगदंड सपोनिरी उध्दव खाडे ,तपासपथकाचे सहा.पोलीस निरीक्षक सागर काटे,पोलीस अंमलदार बंडू मारणे, किरण पवार, महेश वायबसे,आतिक शेख,हनुमंत कुंभार,कुणाल शिंदे, गणेश शिंद, विजय घाडगे, रितेश कोळी,चंद्रकात गडदे,कारभारी पालवे,श्रीकांत चव्हाण,अमर राणे,सुभाष गुरव,दत्तात्रय शिंदे,झनक गुमलाडु, व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.प्रसाद गांकुळ, सपानिरी अमरिश देशमुख ,पोलीस अंमलदार आजीनाथ ओबासे,गोविंद चव्हाण,मौहम्मद नदाफ,प्रविण दळे (युनिट४) यांच्या पथकाने केलेली असुन तांत्रिक बाबीचे काम हे पोलीस अंमलदार सुभाष गुरव प्रशांत सईद, शंकर चिचंकर व माळी यांनी केलेले आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.