युरोपियन देशांमधून पुण्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांची सक्तीची कोरोना चाचणी होणार
पुणे : करोनाचा नव्या प्रकाराचा विषाणू ब्रिटनमध्ये सापडला आहे. या पार्श्वभूमीवर युरोपियन देशांमधून पुण्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांची सक्तीची करोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच संशयित प्रवाशांवर महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. तर, इतर प्रवाशांना 7 दिवस सक्तीचे विलगीकरण करण्यात येणार आहे.
याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी काढले आहेत. दरम्यान, यासाठी आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती प्रशासनाने केली असून, या प्रवाशांच्या वाहतुकीसाठी पीएमपीच्या बसचा वापर करण्यात येणार आहेत.
असे आहे महापालिकेचे नियोजन
– मध्यपूर्व आणि युरोपियन देशातील सर्व प्रवाशांना सक्तीचे 7 दिवसांचे विलगीकरण
– विलगीकरण हॉटेलमध्ये करण्यात येणार असून, सर्व खर्च प्रवाशांना करावा लागणार
– संशयित रुग्णांवर डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार
– विलगीकरणात पाचव्या आणि सातव्या दिवशी होणार करोना चाचणी
– चाचणी निगेटिव्ह असल्यास 7 दिवसांचे विलगीकरण
– प्रवाशांचे पासपोर्ट हॉटेलमध्ये जमा करून घेणार; घरी सोडताना परत देणार
– या देशांव्यतिरिक्त आलेल्या इतर प्रवाशांनाही करोना चाचणी बंधनकारक
जिल्ह्यात संचारबंदीचा निर्णय आज
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रात्रीच्या संचारबंदीबाबत बुधवारी (दि.23) निर्णय घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कृती दलाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये करोनास्थितीचा आढावा घेऊन संचारबंदीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!