राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या १८ लाखांहून अधिक झाली आहे. राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 50 हजाराच्या घरात आली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
इंग्लंडमधील करोना विषाणूमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी विशेष सूचना
कोरोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांकडून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या प्रवाशांची यादी राज्याला प्राप्त झाली असून ही यादी प्रत्येक जिल्ह्याला आणि महानगरपालिकेला पाठविण्यात आली आहे.
संबंधित जिल्हा आणि महानगरपालिका या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करतील.
या चाचणीमध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी एनआयव्ही पुणे येथे पाठविण्यात येतील. या तपासणीतून सदर विषाणू इंग्लंडमधील नवीन विषाणू स्ट्रेनशी मिळताजुळता आहे का, याची माहिती मिळेल.
जे प्रवासी निगेटिव्ह आढळतील त्यांचा पाठपुरावा ते भारतात आल्यापासून पुढील २८ दिवस करण्यात येईल.
या रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येऊन त्या सर्वांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. सर्व निकट सहवासितांना ते पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यापासून पाचव्या ते दहाव्या दिवसादरम्यान आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल.
जे कुणी २५ नोव्हेंबरनंतर इंग्लंडवरुन भारतात आले आहेत त्यांनी स्वतःहून आपल्या जिल्ह्याच्या/ महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागास संपर्क साधून या सर्वेक्षणात सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!