मोठी बातमी : एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली

पुणेः एल्गार परिषदेच्या सभेला पुणे शहर पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. येत्या ३१ डिसेंबरला एल्गार परिषदेने हा कायक्रम आयोजित केला होता. एल्गार परिषदेच्या अनेका कार्यकर्यांनी यासाठी अर्ज केला होता. पण पोलिसांनी त्यांना कार्यक्रमासाठी परवानगी दिलेली नाही.

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी १ जानेवारीला देशभरातले अनुयायी येत असतात.  त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबरला पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.  मात्र या परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.  ए.एन.आय.ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
एल्गार परिषदेला संमती देऊ नये म्हणून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज केले होते.

तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम बंदिस्त ठिकाणी घेण्यासाठी संमती द्यावी अशी मागणी केली होती.  मात्र पुणे पोलिसांनी या परिषदेला परवानगी नाकारली आहे.  दोन वर्षांपूर्वी झालेल्या एल्गार परिषदेशी संबंधित काही विचारवंत आणि दिग्गजांवर कारवाई करण्यात आली होती.या प्रकरणाचा तपास एन.आय.ए.(N.I.A.) देण्यात आला आहे.  दरम्यान यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारीला कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे १ जानेवारी रोजीही दूरदर्शन आणि सोशल मीडियावरुन इथे होणाऱ्या कार्यक्रमाचं प्रसारण सुरु राहणार आहे.  मात्र कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा घेऊ नयेत किंवा पुस्तकांचे स्टॉल्स लावू नयेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

एल्गार परिषद वादाच्या भोवऱ्यात का?

डिसेंबर २०१७ ला शनिवार वाड्यात एल्गार परिषद पार पडली. त्यानंतर कोरेगाव-भीमाला मोठी दंगल उसळली होती. या दंगलीचा थेट संबंध एल्गार परिषदेशी जोडण्यात आला अन एल्गार परिषदेवर राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर हा तपास एनआयएने ताब्यात घेत देशभरात डाव्या विचारांच्या अनेक बुद्धिजीवींना अटक केली. यावरुन देशभरात डाव्या विचारांच्या लोकांनी मोठं काहूर माजवलं.

या सगळ्या परिस्थितीत इतका वादंग सुरु असताना पोलिसांनी परवानगी देवो, अथवा न देवो यंदाही एल्गारची सांस्कृतिक परिषद होणारच, असा निर्धार बी. जी. कोळसे-पाटील यांनी व्यक्त केला होता.

११८ याचिका दाखल

शहरी नक्षलवादाशी जोडली गेलेली एल्गार परिषद, त्यानंतर बुद्धिजीवींना झालेली अटक यावरुन मोठा गजहब झाला. डाव्या आणि उजव्या विचारांचा हा संघर्ष इतक्या शिगेला पोहोचलाय की आत्तापर्यंत या प्रकरणात देशातील विविध न्यायालयात 118 याचिका दाखल आहेत.

ब्राह्मण महासंघाचा विरोध

३१ डिसेंबरला स्वारगेट येथील गणेश कला क्रीडात दिवसभराची ही परिषद होणार आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह काही कलाकृतींचे प्रदर्शन याठिकाणी लावलं जाईल. जेष्ठ विचारवंत अरुंधती रॉय या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कोरेगाव भीमा शौर्य दिन अभियान समितीसह २०० ते ३०० समविचारी संघटना यात सहभागी होतील. मात्र ब्राह्मण महासंघाने या परिषदेला विरोध दर्शविला आहे. विचार करूनच या परिषदेला परवानगी देण्यात यावी, असं ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी सांगितलं.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.