फोन हॅक करून गुगल पेमधून चक्क ८५ हजार सायबर क्रिमिनलने चोरले
नागपूर ः सायबर फसवणूकीची प्रकरणे सतत वाढत आहेत. नवीन युक्त्यांचा अवलंब करून सायबर गुन्हेगार लोकांच्या खात्यातून पैसे उधळतात. सायबर ठगांनी इंटरनेटवर नामांकित कंपन्यांच्या नावावर बोगस ग्राहक सेवा क्रमांकही ठेवले आहेत. आता या संख्येमुळे बरेच लोक फसवणूकीला बळी पडत आहेत. अशातचत नंदनवनमध्ये एका महिलेचा फोन हॅक करून गुगल पेमधून चक्क ८५ हजार रुपये सायबर क्रिमिनलने उडविल्याची घटना उघडकीस आली.
याप्रकरणी पूनम कपिल शेंडे (२५, रा. दर्शन कॉलनी, नंदनवन) यानी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पूनम यांनी गुगल पे डाऊनलोड केले आणि त्याचा वापरही सुरळीत सुरू होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी गुगल पे वापरले नव्हते. त्यामुळे गुगल पे ॲप बंद पडले. त्यांनी कस्टमर केअरला फोन करून तक्रार केली. १४ डिसेंबरला पूनम यांना एक फोन आला. ‘फोन पे कार्यालयातील कस्टमर केअरमधून बोलत आहे, तुमच्या तक्रारीचे समाधान करण्यासाठी फोन केला आहे’अशी माहिती दिली.
गुगल पे सुरू करण्यासाठी एक लिंक पाठविण्यात आली असून, तुम्ही केवळ ती क्लिक करा. तुमचा प्रॉब्लेम सुटून जाईन, अशी माहिती दिली. पूनम यांनी आलेल्या लिंकवर क्लिक केले. त्यानंतर मोबाईल हॅंग झाला. त्याचा डिस्प्ले गेला आणि पाच मिनिटानंतर फोन पुन्हा सुरू झाला. पूनम यांना लगेच ५९ हजार ९९६ रुपये बॅंक खात्यातून काढल्याचा मॅसेज आला आणि त्यांना धक्काच बसला.
पूनम यांच्या खात्यातून पैसे काढल्याचे कळताच त्यांनी पुन्हा त्याच क्रमांकावर फोन केला. पैसे अकाऊंटमधून काढण्यात आल्याची माहिती दिली. आरोपीने एक ॲप मोबाईलवर डाऊनलोड करायला सांगितले. पूनम यांनी पैसे परत मिळतील या आशेने ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर २४ हजार ९९९ रुपये खात्यातून काढल्याचा मॅसेज आला. सायबर क्रिमिनल्सने खात्यातून पैसे उडविल्याचे लक्षात येताच त्यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!