पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ! इंग्लंडहून आलेल्या तरुणाचे रिपोर्ट पाॅझिटीव्ह

पिंपरी चिंचवड :इंग्लंडहून दहा दिवसांपूर्वी शहरात आलेल्या 35 वर्षीय तरुणाचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे. त्याला नवीन भोसरी रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत. याबाबतची महिती महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय
अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

इंग्लंडमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यातच कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू स्ट्रेन आढळला आहे. त्याचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आदेशानुसार, 24 नोव्हेंबरनंतर इंग्लंडहून शहरात आलेल्या व्यक्तींचा शोध महापालिका प्रशासनाने सुरू केला आहे. त्यातील पथकाने पाहणी केल्यानंतर 35 वर्षीय तरुणात कोरोनाची लक्षणे आढळली. त्याच्या घशातील आणि नाकातील द्रावाचे नमुने तपासण्यात आले. त्याचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आला आहे. त्याच्यावर नवीन भोसरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले. तर, 19 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 70 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

भोसरी रुग्णालयात व्यवस्था
इंग्लंडहून आलेल्या व्यक्तींची क्वॉरंटाइनची व्यवस्था वाकड येथील दोन हाॅटेलमध्ये करण्यात आली आहे, अशी व्यक्ती पाॅझिटीव्ह आढळल्यास त्यांच्यावर नवीन भोसरी रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. अशा नवीन रुग्णांसाठी नवीन भोसरी रुग्णालय राखीव ठेवण्यात आले आहे. येथील अगोदरचे अठरा रुग्ण नेहरूनगर येथील जम्बो फॅसिलिटी रुग्णालयात दाखल केले आहेत, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सांगितले.

इंग्लंडहून आलेल्यांचा शोध सुरू
इंग्लंडहून 24 नोव्हेंबरनंतर शहरात आलेल्या व्यक्तींचा शोध महापालिका घेत आहे. त्यासाठी व पाॅझिटीव्ह आढळलेल्यांवर उपचारासाठी स्वतंत्र डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचारी नियुक्त केले आहेत.

इंग्लंड येथून शहरात एकूण 115  प्रवासी आले आहेत. मात्र, 15 प्रवासी पिंपरी-चिंचवड शहाराबाहेर गेले आहेत. 15 प्रवाशांचे पत्ते अपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापर्यंत अद्याप पोहोचता आलेले नाही.  85 प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी केली आहे. त्यापैकी 70 अहवाल निगेटिव्ह आले असून एक अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. उर्वरित 15 जणांचे रिपोर्ट प्रतिक्षेत आहेत, असे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.