कर्नाटक विधानपरिषदेचे उपसभापती एस. एल. धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला

बंगळुरु : कर्नाटक विधानपरिषदचे उपसभापती आणि जेडीएसचे नेते एस एल धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये चिकमंगळुरुमधील कादूरजवळच्या रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह सापडला. कदूर पोलिसांच्या माहितीनुसार, धर्मेगौडा यांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये 15 डिसेंबर रोजी सभागृहात काँग्रेस सदस्यांनी केलेल्या मारहाणीमुळे दु:खी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

विधानपरिषदेत 15 डिसेंबर रोजी काँग्रेस सदस्यांनी एस एल धर्मेगौडा यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. तसंच त्यांना खुर्चीवरुन ढकललं होतं. धर्मेगौडा या घटनेने अतिशय दु:खी होते.

धर्मेगौडा यांचा मृतदेह सोमवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास रेल्वे रुळांवर आढळला. 64 वर्षीय धर्मेगौडा हे लो प्रोफाईल आमदार म्हणून प्रसिद्ध होते. मात्र कर्नाटक विधानपरिषदेत झालेल्या राड्यामुळे ते चर्चेत आले. धर्मेगौडांच्या मृत्यूमुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांचे बंधू एसएल भोजेगौडाही विधानपरिषद आमदार आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांचे ते निकटवर्तीय आहेत.

गोहत्या प्रतिबंधक विधेयकावरुन राडा

कर्नाटक विधानसभेत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर झाले होते. त्यावेळी काँग्रेसने सभात्याग करत निषेध नोंदवला होता. ‘कर्नाटक मवेशी वध रोकथाम एवं संरक्षण विधेयक-2020’ असे या विधेयकाचे नाव होते. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास कर्नाटकात गोहत्येवर बंदी येईल. गायींची तस्करी आणि गोहत्येत सहभागी असणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याच्या नियमांचा या विधेयकात अंतर्भाव आहे. हे विधेयक 2010 साली भाजपने आणलेल्या कायद्याचे सुधारित स्वरुप आहे.

कर्नाटक विधानपरिषेदत 15 डिसेंबरला गोरक्षा कायद्यावरुन जोरदार राडा झाला होता. यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले. भाजप आणि जनता दलाने (सेक्युलर) असंवैधानिक पद्धतीने उपसभापतींना खुर्चीत बसवले. हा प्रकार दुर्दैवी आहे. काँग्रेसने त्यांना आसनावरुन खाली उतरायला सांगितले. ते अवैधरित्या सभापतींच्या आसनावर बसल्यामुळे आम्ही त्यांना सभागृहाबाहेर काढले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार प्रकाश राठोड यांनी दिली होती.

ट्रेनसमोर उडी मारुन जीव दिल्याची सूत्रांची माहिती
चिकमंगळुरु जिल्ह्यातील गुनसागरच्या कडूर तालुक्यात त्यांनी रेल्वेसमोर उडी मारुन जीव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धर्मेगौडा सोमवारी (28 डिसेंबर) रात्री उशिरा आपल्या घरातून कारमधून निघाले होते. बराच वेळ होऊनही ते घर न परतल्याने पोलीस आणि त्यांचे कर्मचारी त्यांना शोधण्यास बाहेर पडले. त्यानंतर आज आज पहाटे रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह सापडला.

 

मूळगावी अंत्यसंस्कार
धर्मेगौडा यांच्यावर चिकमंगळुरुमधील सरपनहल्ली या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी धर्मेगौडा यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “मला विश्वास बसत नाही. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती”

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.