भारताला सर्वात आधी मिळणार ‘कोविडशिल्ड’चे पाच कोटी डोस – अदर पुनावाला.

पुणे : कोरोनावरील लस ‘कोविशिल्ड’चे 4-5 कोटी डोस सर्वप्रथम भारताला दिले जाणार आहेत, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून नुकतीच देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर आदर पुनावाला म्हणाले की, कोरोना  प्रतिबंधक लस ‘कोविशिल्ड’ला जानेवारीत नियामक मंडळाकडून मान्यता मिळेल. त्यानंतर लसीचे चार-पाच कोटी डोस सर्वात आधी भारतात दिले जातील.

पुनावाला म्हणाले, “आमच्याजवळ कोविशिल्डचे चार-पाच कोटी डोस आहेत. एकदा आम्हाला काही दिवसांत लसीकरणाला परवानगी मिळाली की, आपण किती डोस घेऊ शकतो हे सरकारला निश्चित करावं लागेल. आम्ही जुलै २०२१ पर्यंत सुमारे ३० कोटी डोसची निर्मिती करु.”

२०२१ च्या आधी सहा महिने जागतिक स्तरावर डोस कमी पडतील पण यावर काही उपाय नाही. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ पर्यंत इतर लस निर्मिती कंपन्याही डोसची पूर्तता करण्यास सक्षम होतील, असंही पुनावाला म्हणाले.

सिरम इन्स्टिट्यूटही कोरोनावरील लस विकसित करत आहे. सिरमने लस तयार करण्यासाठी अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीसह भागिदारी केली आहे. गेल्या आठवड्यात पुनावाला म्हणाले होते की, जानेवारीपासून भारतात कोरोनावरील लसीकरणास सुरुवात होऊ शकते. पुनावाला यांनी सोमवारी न्यूज एजन्सी ANI शी बातचित केली. ते म्हणाले की, काहीच दिवसात कोरोनावरील लसीच्या वापरासाठी मंजुरी मिळेल आणि कंपनीने ही मंजुरी मिळण्यापूर्वीच लसीचे 4-5 कोटी डोस तयार करुन ठेवले आहेत.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आधी फायझर आणि नंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India, SII) कोरोना लसीच्या आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्याबाबत परवानगी मागितली आहे. यामुळे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लसीच्या वापराची अधिकृतता मिळवणारी पहिली भारतीय कंपनी असणार आहे. सीरमने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून त्यांच्या कोरोना लसीच्या म्हणजेच ‘कोविशिल्ड’ च्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.

सीरम ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाद्वारे विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या लसीचं भारतात ट्रायल आणि उत्पादन करत आहे. यामुळे आपत्कालीन वापरासाठी लसीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी करत त्यांनी जनतेच्या हिताचा हवाला दिला आहे. याने कोरोनाचा धोका टाळण्यास आणखी मदत होईल असं सीरमने म्हटलं आहे. त्यामुळे यावर आता काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

आपत्कालीन मंजुरी म्हणजे काय?

आणीबाणी वापर प्राधिकरण म्हणजेच आपत्कालीन मंजुरी ही औषधं, निदान चाचण्या किंवा वैद्यकीय उपकरणांसाठीसुद्धा घेतली जाते. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन ही आपत्कालीन मंजुरीसाठी नियामक आहे. लसी आणि औषधाचा वापर अनेक चाचण्या आणि निकालानंतर मंजूर केला जातो. पण कोरोनासारखा जीवघेणा संसर्ग किंवा इतर साथीचा रोग असल्याच यासाठी लसीच्या वापरावर जोख स्वीकारत आपत्कालीन मंजुरी दिली जाते.

लस बनवण्याच्या बाबतीत सिरम सर्वात पुढे

कोरोनावरील लस बनवण्याच्या बाबतीत भारताची औषध निर्मिती करणारी कंपनी सिरम इन्स्टिट्यूट सर्वात पुढे आहे. ऑक्सफोर्डसोबत हातमिळवणी करत कोरोनावरील लस बनवण्याच्या कामात व्यस्त असलेल्या या कंपनीची स्थापना 1966 मध्ये झाली होती. सायरस पुनावाला हे या संस्थेचे संस्थापक आहेत. कोरोनावरील लस बनवण्याच्या स्पर्धेत दुसऱ्या नंबरवर भारत बायोटेक ही कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1996 मध्ये झाली होती. डॉ. कृष्ण एल्ला यांनी ही कंपनी सुरु केली होती. या कंपनीचे अध्यक्ष म्हणून सध्या डॉ. व्ही. कृष्ण मोहन कारभार सांभाळत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.