चोरांना पाहून पळ काढणाऱ्या ‘त्या’ पोलिसांचे निलंबन
पुणे: औंध येथील एका सोसायटीत घरफोडी करून चोरटे बाहेर येताना दिसताच, त्यांना पकडण्याऐवजी पळून जाणाऱ्या पुणे पोलीस दलातील त्या दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.औंध येथील शैलेश टॉवरमध्ये सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता.हा घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे मत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी या संदर्भातील आदेश काढला आहे. पोलीस हवालदार प्रवीण रमेश गोरे आणि पोलीस नाईक अनिल दत्तू अवघडे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.निलंबन कालावधीत पुणे पोलीस मुख्यालय सोडून जाताना परवानगी घ्यावी आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे दररोज हजेरी द्यावी, असे आदेशात म्हटले आहे
गोरे व अवघडे यांची औंध परिसरात शनिवारी रात्री ते रविवारी सकाळपर्यंत बीटमार्शल म्हणून नेमणूक होती. औंध येथील शैलेश टॉवर या सोसायटीत शिरलेल्या चोरांची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली होती. पोलीस नियंत्रण कक्षाने ही माहिती या दोघा बीट मार्शल यांना दिली. त्यानुसार हे मार्शल सव्वातीन वाजता त्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी एसएलआर रायफल असणारे अवघडे मोटारसायकलवरुन खाली उतरले. त्याचवेळी शैलेश टॉवरच्या आवारातून ४ शस्त्रधारी चाकू, कटावणी व गज घेऊन या मार्शलच्या समोरुन जाऊ लागले. ते पाहून मोटारसायकलवरील गोरे यांनी आपले सहकारी अवघडे यांना तेथेच सोडून मोटारसायकल वळवून पळून गेले. चोरट्यांपैकी एकाने अवघडे यांना मारण्याकरीता त्यांच्या हातातील कटावणी उगारली व दुसऱ्याने गाडी निकालो और इनको ठोक दो असे म्हणाला. इतर चोरट्यांच्या हातात चोरीचे सामान होते. अवघडे यांच्याकडे एसएलआर रायफल असून देखील त्यांनी या चोरट्यांना अटकाव करण्याचा, पकडण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच चोरटे पळून गेल्यानंतरही त्यांचा पाठलाग केला नाही.
या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला आपल्या वॉकी टॉकी अथवा मोबाईलवरुन माहिती दिली नाही. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील रात्रगस्तीवरील अधिकारी व कर्मचारी यांना माहिती न मिळाल्याने चोरटे सुरक्षारक्षकाला मारहाण करुन पोलिसासमक्ष पळून जाण्यास यशस्वी झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला होता. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याने पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दोघांना निलंबित केले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!