“आम्ही स्नॅपडील मधून बोलतोय, तुम्हाला कार बक्षीस मिळाली आहे” असं सांगत तब्बल 20 लाख 88 हजार 350 रुपयांची फसवणूक

पिंपरी चिंचवड : आम्ही स्नॅपडील मधून बोलत आहोत. तुम्हाला एसयूव्ही कार बक्षीस मिळाली आहे’ असं सांगत तब्बल 20 लाख 88 हजार 350 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना सांगवी परिसरात समोर आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दााखल करण्यात आला आहे.हा प्रकार 28 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत घडला आहे

अनिलकुमार शीतलप्रसाद तिवारी (वय 51, रा. पिंपळे गुरव) यांची फसवणूक करण्यात आली असून याबाबत त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एक महिला आरोपी, दयाशंकर जगदंबा प्रसाद मिश्रा आणि यंकप्पा अशा तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी तिवारी यांना फोन करून ‘आम्ही स्नॅपडीलमधून बोलत आहोत. तुम्ही आमच्या कंपनीचा ऑक्सीमीटर घेतला आहे. तुम्हाला महिंद्रा कंपनीची एसयूव्ही 500 कार बक्षीस मिळाली आहे.’ असे सांगितले. कार लागल्याच्या आनंदात तिवारी यांच्याकडून आरोपींनी एसबीआय बँकेचे खातेधारक के बालाकृष्ण, झरना मिश्री, तोबुंग पर्टीन, प्रवीण शर्मा आणि इंडियन ओव्हरसिस बँकेचे खातेधारक संतोष वर्मा यांच्या बँक खात्यावर वेळोवेळी पैसे पाठवण्यास लावले. आरोपींनी वरील कालावधीत तिवारी यांच्याकडून तब्बल 20 लाख 88 हजार 350 रुपये घेतले.

पैसे घेऊन तर त्यांना कार दिली नाहीच पण त्यांची घेतलेली रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. याबाबत भारतीय दंड विधान कलम 420, 34, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66 डी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.