केटरिंग व्यावसायिकाने कामगाराचा मृतदेह चादरीत गुंडाळून रस्त्यावर फेकला, हडपसर मधील घटना
पुणे : केटरिंग कामगाराचा रात्री झोपेतच मृत्यू झाल्यानंतर मालकाने मित्रांच्या मदतीने त्याचा मृतदेह पुण्यातील हडपसर परिसरात टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चादरीत मृतदेह रस्त्यावरच आढळल्याने मात्र परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोष असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याचे पूर्ण नाव समजलेले नाही. पोलिसांनी नायरण व्यास आणि त्याच्या दोन साथीदारांना पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यास याचा केटरिंगचा व्यवसाय आहे. तो लोणीकाळभोर येथे असून, राहण्यास देखील आहे. दरम्यान हडपसर परिसरात ब्रिजजवळ अनेक बिगारी कामगार उभे असतात. काहीजण येथून कामगार नेतात. त्याच प्रमाणे व्यास यांनी देखील संतोष याला कामासाठी लोणीकाळभोर येथे नेले होते. त्याने दिवसभर काम केले आणि रात्री कामगारांच्या खोलीत झोपला. सकाळी व्यास त्याला उठवण्यास गेल्यानंतर मात्र तो मयत झाला होता.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर भितीने व्यास याने त्याच्या दोन मित्रांना बोलावले. हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी चादरीत मृतदेह गुंडाळला आणि सकाळी सकाळी छोटा हत्तीमधून मगरपट्टा सिटी येथील लोहिया गार्डनजवळ पुटपाथवर मृतदेह ठेवून पसार झाले. नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी हडपसर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला आहे. शोध घेतल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. दरम्यान हा सर्व प्रकार लोणी काळभोर परिसरात घडला असून, आकस्मित मृत्यूची नोंद केल्यानंतर तो लोणीकाळ भोर पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!