कोरोना लसीकरणाचा ‘ड्राय रन’ 2 जानेवारीला होणार; ‘या’ चार जिल्ह्यांची निवड

मुंबई : कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर दि. २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशा प्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन साईट (आरोग्य केंद्र) निवडण्यात आले आहेत. लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही ठिकाणच्या प्रत्येकी २५ जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे.

लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जातील.

महाराष्ट्रातील पुणे येथील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय, नागपूर जिल्ह्यातील डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जालना येथील जिल्हा रुग्णालय जालना, उपजिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे.

ड्राय रनसाठी म्हणजे काय ?

ड्राय-रन हा एक सराव किंवा रंगीत तालीमप्रमाणे आहे. यामध्ये कोव्हिड-19 ची लस आल्यानंतर लसीकरण मोहीम कशा प्रकारे राबवली जाईल, त्यासाठी काय तयारी करावी लागेल, या गोष्टींचा विचार केला जातो

लसीकरण मोहिमेत कोणत्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, त्या अडचणी कशा प्रकारे दूर केल्या जातील, हे सुद्धा यावेळी तपासलं जाईल.

यानंतर 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना आणि इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना ही लस प्राधान्याने दिली जाणार आहे.

राज्यांकडून याबाबतचा डेटाबेस तयार केला जात आहे. यासाठी को-विन या अप्लीकेशनवर फॉर्म भरून सर्वप्रथम लोकांची नोंदणी करून घेतली जाईल. त्यानंतर लसीकरणाची तारीख, वेळ आणि केंद्र लोकांना मॅसेज करूनच कळवण्यात येणार आहे.

ड्राय रनसाठी कशी आहे तयारी?

केंद्र सरकारने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, को-विन मोबाईल अपचा वापर स्थानिक पातळीवर कसा केला जातो, हे पाहणं या ड्राय रनचा प्रमुख उद्देश आहे.

याशिवाय लसीकरण करण्याच्या प्रक्रियेचं नियोजन कशा पद्धतीने चालतं, यामध्ये समन्वय राखण्यात कोणती आव्हानं येऊ शकतात, हे पाहिलं जाईल. यामुळे ग्राऊंड लेव्हलवर काम करणाऱ्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल.

हे सगळं काम 20 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमावलीनुसारच केलं जाणार आहे. प्रभारी अधिकाऱ्याला लसीकरणासाठी निवडण्यात आलेल्या 25 लोकांची ओळख पटवावी लागेल. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला या सर्वांची माहिती को-विन अॅपवर अपलोड करावी लागेल. हे सगळं काम एका मॉक-ड्रिलप्रमाणे असेल. प्रत्यक्षात कुणाला लस दिली जाणार नाही.

भारतात अजूनही कोणत्याही लशीला मंजुरी मिळालेली नाही. ड्राय रनचा उद्देश लस देणं नव्हे तर लसीकरण प्रक्रिया योग्य प्रकारे अंमलात येईल किंवा त्यामध्ये आणखी काही सुधारणा करणं गरजेची आहे, हे तपासणं आहे.

देशातील लसीकरणासाठी सुमारे 96 हजार जणांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे, असं केंद्र सरकारने कळवलं आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.