पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशाएवढं, कोणी कितीही आदळआपट केली तरी डाग लागणार नाही; मुख्यमंत्र्यांकडून गौरवोद्गार

मुंबई : “तुम्ही दक्ष राहता, जबाबदारी घेता म्हणून आम्ही आमचे सण उत्साहाने साजरे करतो, त्यासाठी तुमचे धन्यवाद, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत आभार व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई पोलीस आयुक्तालयात नववर्षाचं स्वागत केलं. “कोणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्त्वाला डाग लागणार नाही,” याची मला खात्री आहे, असंही ते म्हणाले.

 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “तुम्ही सतत ताणतणावात असता. नववर्षाची सुरुवात माझ्या बहाद्दर कुटुंबीयांच्या समवेत उपस्थित राहून करावी, या जाणिवेने मी महाराष्ट्र आणि मुंबईतील नागरिकांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो आहे. तुम्हाला हे वर्षच नाही तर पुढील अनेक वर्षे सुखाची, समाधानाची, भरभराटीची आणि ताणमुक्ततेची जावो, अशी प्रार्थना करतो.”

पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर…
दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती जी काही नियंत्रणात आहे ती पोलिसांमुळेच, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले की, “कोरोनाच्या काळात फ्रण्टलाईनवर लढताना अनेक पोलीस शहीद झाले. कोरोनाचं संकट आल्यावर आपण लॉकडाऊन केलं. वर्क फ्रॉम होम, सगळ्यांना सांगितलं घरातून काम करा. क्षणभर विचार करा, पोलिसांनी वर्क फ्रॉम होम पोलिसांनी केलं असतं तर काय झालं असतं? पण तसं झालं नाही. म्हणून आता जी काही परिस्थिती नियंत्रणात आहे ती त्यांच्यामुळेच.”

 

पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली : मुख्यमंत्री
“पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. “पोलीस दलाची बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली. कारण तुमच्या कर्तृत्वाला तोड नाही. ही परंपरा 100-150 वर्षांपासूनची आहे. तुमचं कर्तृत्त्व सूर्यप्रकाशाएवढं मोठं आहे. त्यामुळे कोणी कितीही आदळआपट केली तरी तुमच्या कर्तृत्वाला कोणीही डाग लावू शकणार नाही, याची मला खात्री आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.