महावितरण कंपनीत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून 50 लाखांना गंडा; तिघांविरूद्ध गुन्हा दाखल

नगर : महावितरण कंपनीत नोकरीला लावून देतो, म्हणून तिघा जणांनी 24 जणांकडून वेळोवेळी 50 लाख 10 हजार रुपये घेवून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्लाउद्दीन ऊर्फ बाबा मोहंमद खान, जाकीर अल्लाउद्दीन खान (रा. रेल्वेस्टेशन जवळ, नगर) व विनय काळे (पूर्ण नाव माहिती नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी एकनाथ मल्हारी रणदिवे (रा. रेल्वे स्टेशनजवळ, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी जाकीर खान हा महावितरण कंपनी, नाशिक येथे अतिरिक्त कार्यकारी अभियंता असल्याचे अल्लाउद्दीन खान व जाकीर खान यांनी रणदिवे यांना सांगितले होते. 2018 मध्ये नाशिक महावितरण कंपनीत विविध पदांच्या जागा भरायाच्या असल्याचा खोटा बनाव करून अल्लाउद्दीन याने रणदिवे यांना विश्‍वासात घेतले.

अल्लाउद्दीन याने तोतया अभियंता विनय काळे याला वेळोवेळी उभा करून रणदिवे यांच्यासह त्यांच्या 24 नातेवाईकांकडून 50 लाख 10 हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. मात्र, महावितरण कंपनीत नोकरी दिलीच नाही.

दरम्यान, रणदिवे यांनी नातेवाईकांच्या मदतीने आरोपींकडे पैशाची मागणी केली असता, त्यांनी 50 लाख 10 हजार रुपयांचा धनादेश दिला. तो धनादेशवटला नसल्याने रणदिवे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कचरे करीत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.