‘हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय’; कंट्रोल रुममध्ये फोन करणाऱ्या पुणेकरांना सुखद धक्का

पुणे : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पुणेकरांना सुखद धक्का दिला. विविध तक्रारींसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या पुणेकरांना गृहमंत्र्यांनी स्वत: उत्तर दिलं.

हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय. तुमची तक्रार काय आहे? असं म्हणत तक्रारी लिहून त्यांनी संबंधित विभागातील पोलीस स्टेशनमध्ये कळवल्या.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सकाळीच पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली. गेले दहा महिने डॉक्टर, नर्स, पोलीस सगळे जण कोरोनाविरोधात अथक लढा देत आहेत. त्यामुळे पोलीस दलाचा उत्साह आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी गृहमंत्री पुण्यात गेले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत केक कापत त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं. तसंच वायरलेसवरुन कर्मचाऱ्यांशी संवाद साधत शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर नियंत्रण कक्षात जाऊन स्वत: काही फोन कॉल्सना उत्तरही दिलं.

यावेळी एका नागरिकाने सोयायटीमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजत असल्याची तक्रार करण्यासाठी नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यावेळी तुमची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कळवू असं उत्तर देशमुख यांनी सांगितलं. नियंत्रण कक्षात खुद्द गृहमंत्रीच फोन कॉल्सना उत्तर देत असल्याचं पाहून कर्मचारी आणि तक्रार करणाऱ्या पुणेकरांनाही आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

आमचे पोलीस या दहा महिन्यात दिवस रात्र काम करुन थकला जरुर आहे, पण हिंमत हरलेला नाही. आजही त्याच हिंमतने सणवार असो, उत्सव असो, मोर्चे असो, आंदोलनं असो पोलीस दिवसरात्र रस्त्यावर राहून काम करत आहेत. 31 डिसेंबरला नागरिक नववर्षाचं स्वागत करत असताना पोलीस रस्त्यावर उभं राहून कायदा-सुव्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे यासाठी काम करतोय. त्यामुळे मी आज नवीन वर्ष साजरं करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात आलो. मी सर्व पोलीस सहकाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया यावेळी अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.