सिडकोत गॅस गिझर फुटल्याने बाथरूममध्ये तरुणाचा गुदमरून मृत्यू

सिडको (नाशिक) : एकीकडे नववर्षाचे स्वागत करत असतानाच वर्षाचा पहिल्याच दिवशी पाटील कुटुंबियात मात्र ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश पाहायला मिळाला. गॅस गिझर  फुटल्याने एका युवकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची धाक्कादायक घटना शहरातील सिडको परिसरात घडली.१ जानेवारीलाच दुपारी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ​

गौरव समाधान पाटील (वय २७) मृत तरुणाचे नाव आहे.गौरव शुक्रवारी ( 1 जानेवारी) दुपारी अंघोळ करत असताना हा प्रकार घडला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच श्वास गुदमरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार,दौलतनगरमधील गौरव हा राधावृंदावन अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये शुक्रवारी (ता. १) दुपारी चारच्या सुमारास बाथरूममध्ये होता. बाथरूममधील गॅस गिझर अचानकपणे फुटले.त्यामुळे गौरवला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.  अचानकपणे घडलेल्या या प्रकारमुळे त्याचे कुटुंबीय घाबरले. त्यांनी तत्काळ बाथरुमकडे धाव घेत गौरवला बाहेर काढले. त्याचे कुटुंबीय तसेच त्याच्या मित्रांनी त्याला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, श्वास घेण्यास जास्तच त्रास जाणवू लागल्यामुळे त्याचा रस्त्यातच मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. पोलिस उपनिरीक्षक एच. व्ही. शेळके तपास करीत आहेत.

गॅस गिझर काय आहे ?

विशेषत: अंघोळ करण्यासाठी गॅस गिझरचा उपयोग होतो. इलेक्ट्रिक गिझरसारखीच गॅस गिझरचीही कार्यप्रणाली आहे . गॅस गिझरच्या खाली एक गॅस बर्नर लावलेले असते. याच बर्नरच्या साहाय्याने गॅस गिझरमध्ये पाणी गरम होते. गिझर चालू केल्यानंतर काही क्षणांत पाणी गरम व्हायला सुरुवात होते. पाणी गरम होण्याची ही प्रक्रिया अत्यंत जलद असल्यामुळे गिझरमध्ये दाब निर्माण होते. हा दाब गिझरमध्ये जमा होऊ नये म्हणून गिझरला प्रेशर वॉल्व असतात. या वाल्वद्वारे गॅस गिझरमधील प्रेशर बाहेर पडते.

गॅस गिझरला पसंती का ?

इलेक्ट्रिक गिझरप्रमाणेच गॅस गिझरसुद्धा काम करते. यामध्ये पाणी अत्यंत जलद गतीने गरम होते. तसेच गरम पाण्याचा सतत पुरवठा गॅस गिझर करते. या कारणांमुळे नागरिकांची गॅस गिझरला पसंती असते. हे गिझर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसवर चालवले जाते.

काय काळजी घ्याल?

>>> गॅस गिझरमधून निघणारा कार्बन मोनॉक्साईड हा गॅस शरीरासाठी हानिकारक असतो. तो रंगहीन असल्यामुळे गॅस गिझर लीक झालेले कळूनही येत नाही. त्यामुळे गॅस गिझर लीक झाल्याची थोडी जरी शंका आली तर गॅस गिझर बंद करावे.

>>> कार्बन मोनॉक्साईड श्वासावाटे शरीरात गेल्यामुळे काही मिनिटांत चक्कर येते. अशी काही लक्षणं आढळल्यास तत्काळ बाथरुमच्या बाहेर यावे.

>>> गॅस गिझर लावताना बाथरुममध्ये मोकळी जागा आणि नैसर्गिक हवा येण्यासाठी जागा आहे का?, याची चाचपणी करावी. तसेच, बाथरुम मोठे असेल तरच गॅस गिझर लावावे.

>>> बाथरुममध्ये जाण्यापूर्वी गॅस गिझर बंद केलेलं होतं का याची खात्री करुन घ्या.

>>> कार्बन मोनॉक्साईड शरीरात गेल्यानंतर घरगुती उपाय करण्यापेक्षा रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करा.

>>> रुग्ण बेशुद्ध पडल्यानंतर त्याला तुमच्या तोंडावाटे श्वास देण्याचा प्रयत्न करु नाका. कारण त्यामुळे तुम्हाच्याही शरीरात कार्बन मोनॉक्साईट हा वायू जाण्याची शक्यता असते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.