४ जानेवारी रोजी पुण्यात होणार राज्यस्तरीय युवा संसद

 

विजयी स्पर्धकांना मिळणार संसदेच्या केंद्रीय सभागृहात बोलण्याची संधी-जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर

पुणे : देशातील युवकांनी विविध सामाजिक प्रश्न जाणून घेऊन त्यांचा सखोल अभ्यास करावा, युवकांच्या वकृत्व कौशल्यात भर पडावा या उद्देशाने केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे नेहरु युवा केंद्राचे जिल्‍हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर यांनी दिली .

या अभियानाची राज्य पातळीवरील स्पर्धा दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी नेहरू युवा केंद्र, पुणे आणि राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय, पुणे यांच्या वतीने गोखले इंस्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड एकोनॉमिक्स, पुणे येथे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. या स्पर्धेत राज्यातील एकूण ३४ जिल्ह्यातून जिल्हास्तरीय युवा संसदेतून प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने विजयी ठरलेले असे एकूण ६८ स्पर्धक सहभागी होणार आहेत. राज्यस्तरीय युवा संसदेत प्रथम आलेल्या स्पर्धकास संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसदेत प्रत्यक्ष बोलण्याची तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणार्‍या स्पर्धकास राष्ट्रीय युवा संसदेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय पातळीवर विजयी होणाऱ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे 2 लाख, दीड लाख आणि एक लाख अशी भरघोस परितोषिके दिली जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हेही राज्यस्तरीय युवा संसदेत ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहून राज्यातील युवकांचे वकृत्वगुण जाणून घेणार आहेत. नेहरू युवा केंद्र संघटनचे राज्य संचालक पी. पी. हिंगे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर यांनी राज्यस्तरीय युवा संसदेचे आयोजन केले असल्याचे प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.