मुलीची छेड काढण्याचा जाब विचारणाऱ्या ग्राहकालाच मारहाण, हिंजवडीमधील घटना

हिंजवडी : मुलीची छेड काढण्याचा जाब विचारणाऱ्या ग्राहकलाच मारहाण करण्यात आल्याचा प्रकार हिंजवडी मधील एफ.एम.एल हॉटेल मध्ये समोर आला आला आहे. या मारहाणीत ग्राहकाची सोन्याचे चेन चोरीला गेल्याच्या आरोपांवरून हिंजवडी पोलिसांनी एफ.एम.एल हॉटेलचे मालक, मॅनेजर आणि त्यांच्या इतर साथिदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 31 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.30 ते 12.30 दरम्यान घडली.

याप्रकरणी निनाद प्रशांत सोनपावले (वय- 25 रा. मसकिर निस कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफ.एम.एल हॉटेलचे मालक, मॅनेजर आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र बाळा भोसले आणि हरीश दाभाडे हे 31 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हिंजवडी येथील एफएमएल हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या शेजारी असलेल्या टेबलवर बसलेला एक तरुण दारु पिऊन मुलीची छेड काढत होता. त्यावेळी हरिश दाभाडे याने त्या तरुणाला तू छेड का काढतोस अशी विचारणा केली. त्यावेळी दारुच्या नशेत असलेल्या तरुणाने त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. या झटापटीत हरिश दाभाडे याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन कोणीतरी चोरली.

फिर्यादी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हॉटेल मॅनेजरने फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना हॉटेलच्या मागील दरवाजाने बाहेर काढले. त्यानंतर हरीश दाभाडे याने आपला भाऊ यशवंत दाभाडे याला फोन करून हॉटेल एफएमएल येथे घडलेला प्रकार सांगून त्याला येण्यास सांगितले.

यशवंत दाभाडे यांनी हॉटेल मॅनेजरकडे या प्रकरणाबाबत जाब विचारला असता मॅनेजरने यशवंत दाभाडे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी यशवंत दाभाडे यांनी मॅनेजरला चापट मारली. या घटनेची माहिती मॅनेजरने मालकाला दिली. त्यावेळी मालक आपल्या सोबत काही मुलांना घेऊन हॉटेलमध्ये पोहचले. त्यांनी फिर्यादी निनाद, हरीश आणि यशवंत यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी निनाद यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किंमतीची 2 तोळे वजनाची सोनसाखळी कोणीतरी हिसका मारुन चोरून नेली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक देंडगे करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.