हॉटेल बंद झाल्यामुळे जेवण मिळाले नाही त्यावरून कोयत्याने वार करत तरुणावर खुनी हल्ला
पिंपरी चिंचवड : हॉटेल बंद झाल्यामुळे सहा जणांना जेवण मिळाले नाही. त्यावरून सहा जणांनी एका तरुणाच्या घरात घुसून त्याच्यावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. दरम्यान भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या तरुणाच्या आत्याला देखील सहा जणांनी कोयत्याने मारून जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री साडेअकरा वाजता देहूरोड येथील पोर्टर चाळ येथे घडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करत चार जणांना अटक केली आहे.
सनी आठवाल, राहुल चंद्रमणी ओव्हळ (वय 28, दोघे रा. देहूरोड), अभिजित आठवाल, करण आठवल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या अन्य दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद कृष्णा नाडार (वय 23, रा. पोर्टर चाळ, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोर्टर चाळ देहूरोड येथे फिर्यादी यांचा मित्र विकी जाधव यांचे हॉटेल आहे. ते हॉटेल शुक्रवारी रात्री अकरा वाजता बंद झाले. हॉटेल बंद झाल्यानंतर आरोपी जेवण करण्यासाठी हॉटेलसमोर आले. मात्र हॉटेल बंद असल्याने त्यांना जेवण मिळाले नाही. त्यावरून आरोपी फिर्यादी आनंद यांच्या घरासमोर आले. त्यांनी शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आनंद यांच्यावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. यात आनंद गंभीर जखमी झाले. हे भांडण सोडविण्यासाठी आनंद यांच्या आत्या आल्या असता आरोपींनी त्यांना देखील मारहाण करून जखमी केले. त्यानंतर आरडा-ओरडा करून दहशत पसरवून आरोपी निघून गेले. पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!