जीवनावश्यक घरगुती गॅसची चोरी करुन काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, १९ जणांना अटक
पिंपरी चिंचवड : जीवनावश्यक घरगुती गॅसची चोरी करुन काळ्या बाजारात विक्री करणाऱ्यांना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहे. दोन वेगवेगळ्या कारवाईत 77 लाख 40 हजार 731 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 19 जणांना अटक करण्यात आली आहे.
सामाजिक सुरक्षा पथकाने पहिली कारवाई खेड तालुक्यातील चिंबळी येथे रविवारी (दि.3) करणाऱ्या आली. याप्रकरणी दुकान मालक विलास भगवान खोडे (शिंदे) (वय 42 रा. चिंबळी गावठाण), टेम्पो चालक सतिश मनोहर परबत (वय-35 रा. चिंबळी चौक) आणि स्वयंभू गॅस एजन्सीचा मालक रविंद्र सातकर या तिघांना अटक केली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,ज्ञानेश्वर महाराज व मोतीराम महाराज गॅस सर्व्हिसिंग स्टील होम रिपेरिंग सेंटर, स्वयंभू भारत गॅस येथे विनापरवाना घरगुती गॅसची चोरी करुन तो सिलेंडरमध्ये भरून साठवणूक व विक्री करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने येलवाडी परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 7 हजार रुपये रोख रक्कम, सात लाख 10 हजार किंमतीचा चारचाकी टेम्पो, 4 लाख 55 हजार 226 रूपयांच्या गॅसच्या 153 रिकाम्या टाक्या, 126 गॅसने भरलेल्या टाक्या असा एकूण 11 लाख 72 हजार 366 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.
पथकाची दुसरी कारवाई आज सोमवारी (दि.4) दुपारी 1.45 वाजता इंदोरी टोलनाक्याजवळील येलवाडी या ठिकाणी करण्यात आली. याप्रकरणी रुपेश रामदुलार गौड (वय 25, रा. चेंबुर, मुंबई), मुख्य वितरक दिनेशकुमार लेखरात विष्णोई (वय 30, रा. येलवाडी, देहू, मुळगाव जोधपूर, राजस्थान) तसेच त्यांचे इतर 15 साथीदार यांच्या विरुध्द म्हाळुगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी एचपी कंपनीच्या 15 टन कॅप्सूलमध्ये गॅस भरून गॅसची चोरी करुन त्याची काळ्या बाजारात विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने येलवाडी परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 60 लाख 96 हजार किंमतीचा भरलेला कॅप्सूल गॅस टँकर, 25 लाख 85 हजार किंमतीचा एक टेम्पो, महिंद्रा पिकअप, दोन बोलेरो पिकअप, चार ॲपे, दोन छोटा हत्ती व वॅगनार अशी एकूण 10 वाहने तसेच, तीन लाख 15 हजार किंमतीच्या 184 रिकाम्या गॅस टाक्या, 1 लाख 16 हजार 030 रोख रक्कम, 1 लाख 88 हजार 700 रूपयांचे 18 मोबाईल, 12 हजार 135 रूपयांचे इलेक्ट्रीक वजन काटे व पाईप कनेक्टर असा एकूण 65 लाख 68 हजार 365 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सपोनि निलेश वाघमारे, सपोनि डॉ.अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे, नितीन लोंढे, संदिप गवारी, संतोष असवले, भगवंता मुठे, महेश बारकुले, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, योगेश तिडके, राजेश कोकाटे, वैष्णवी गावडे, संगिता जाधव, सोनाली माने, योगीनी कचरे, तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रशांत सोरटे, सचिन नागरे, होमगार्ड मयुर ढोरे यांनी केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!