येत्या वर्षात आरोग्याच्या उपाय योजनांवर लक्ष केंद्रीत करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश.

नाशिक : कोरोनाच्या परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत आहे. येत्या वर्षात आरोग्याच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करण्यात यावे. आरोग्य विभाग, प्रशासन यंत्रणेने कोटेकोरपणे कोरोनाच्या येणाऱ्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घेवून लसीकरणासंदर्भात नियोजन करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

नाशिक मधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या गंगापूर येथील ग्रेप पार्क रिसॉर्ट येथे आज कोरोना विषयक आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, नितीन पवार, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोरोनातून जे रुग्ण बरे झाले आहेत त्या रूग्णांमध्ये वेगवेगळे आजार आढळून येत असल्याने त्यांच्या उपचारासाठी शहरी व ग्रामीण भागात पोस्ट कोविड सेंटरची व्यवस्था करण्यात यावी. कोरोना लसीकरणाच्या अनुषंगाने राज्यातील नंदुरबार, पुणे, जालना, नागपूर येथे ड्राय रन घेण्यात आला असून व्यवस्थित पार पडला असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

तसेच कोरोनाकाळात महत्त्वाची कामगिरी बजावणारे डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर्स, आरोग्य विभागाचे सर्व कर्मचारी, पोलीस यंत्रणा यांना त्यांचे मानधन वेळेत देण्यात यावे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया लवकरच करण्यात येणार असल्याने त्याबाबत जिल्ह्याच्या रिक्त पदांची माहिती सादर करण्यात यावी. कोरोनाच्या दुसऱ्या विषाणूच्या संदर्भात इंग्लंडवरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करून ते नागरिक पॉझिटिव्ह आढल्यास त्याबाबत योग्यती काळजी घेऊन त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

कोरोना काळात सार्वजनिक आरोग्य विभाग, मदत पुनवर्सन, अन्न नागरी पुरवठा, पोलीस यंत्रणा अशा महत्त्वाच्या विभागांना देण्यात येणाऱ्या निधीत कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही. चालु वर्षातील उर्वरित तीन महिन्यात जिल्हा नियोजन समिती व स्थानिक विकास निधी यांचा वापर लोककल्याणासाठी करण्यात यावा. आतापर्यंत कोरोनाबाबत राज्यातील परिस्थितीमध्ये थोड्याप्रमाणात सुधारणा होत आहे. आतापर्यंत ज्यापद्धतीने प्रशासनाने काम केले आहे याचप्रमाणे यापुढे देखील काम करण्यात यावे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ऑक्सिजनची उपलब्धता मुबलक प्रमाणात असून आजच्या स्थितीला साधारण 85 मेट्रीक टन ऑक्सिजन जिल्ह्यात उपलब्ध आहे. तसेच व्हेंटीलेटरर्स बेड देखील पुरेशा प्रमाणात आहेत. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यतमातून पाच हजार कोरोनाबाधित रूग्णांचा शोध घेण्यात आला असून त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यात आले आहेत. कोरोना लसीकरणाबाबत जिल्ह्यात नियोजन करण्यात आले असून 667 आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागात देखील ऑक्सिजनचा पुरवठा आवश्यक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इंग्लड येथून आलेले दोन प्रवासी बाधित आढळून आले आहेत, परंतू ते इंग्लडमध्ये नव्याने आलेल्या स्ट्रेन या विषाणूने बाधित नसल्याने त्यांच्यावर कोरोनासंदर्भातील उपचार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उद्यापासून जिल्ह्यात शाळा सुरू करण्यात येत असून त्याअनुषंगाने देखील योग्य काळजी घेण्यात येत आहे. अशी माहिती बैठकीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.