केंद्राने गरिबांना मोफत लस द्यावी म्हणून आग्रह धरणार  : राजेश टोपे

मुंबई : दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना कोरोना लस मोफत मिळालीच पाहिजे असा आग्रह राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धरला आहे. मोफत लसीबाबत केंद्राने निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. मात्र गरिबांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले. महाराष्ट्रात गरिबांना मोफत लस मिळणार असल्याचे हे संकेत तर नाही अशी चर्चा आता रंगू लागली आहे. तसंच राज्यात 8 जानेवारीला सर्व जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचं ड्राय रन होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. ,

 

मुंबईत कोरोना लसीकरण आणि नव्या विषाणूसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत राजेश टोपे बोलत होते. यावेळी कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनचे राज्यात एकूण आठ रुग्ण असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली

गरिबांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार


दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना कोरोनाची लस मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. “सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रण्ट लाईन कर्मचारी, जुना आजार असलेले 50 वर्षांवरील रुग्ण अशा जवळपास तीन कोटी जणांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. उद्या आरोग्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत गरिबांना मोफत लस देण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार आहे. गरिबांना लसीच्या दोन डोससाठी 500 रुपये लादणं हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने हा खर्च उचलावा. जर केंद्र सरकारने हा खर्च केला नाही तर राज्य सरकारच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील. राज्य सरकारच्या राज्याच्या अखत्यारित येणाऱ्या लोकांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, अस राजेश टोपे यांनी सांगितलं.

 

8 जानेवारीला लसीकरण
28 आणि 29 डिसेंबर रोजी देशातील चार राज्यात कोरोना लसीकरणाचं ड्राय रन झाल्यानंतर संपूर्ण देशभरात ड्राय रन करणार असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. त्यानुसार 2 जानेवारील राज्यातील तीन जिल्ह्यात लसीकरणाचं ड्राय रन झालं. आता 8 जानेवारीला सर्व जिल्ह्यात लसीकरणाची रंगीत तालीम होणार असल्याचं टोपे यांनी म्हटलं. या ड्राय रनच्या माध्यमासाठी लसीकरणासाठी यंत्रणा कितपत सज्ज आहेत याचा आढावा घेतला जाणार असल्याचं ते म्हणाले.

 

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे राज्यात 8 रुग्ण
ब्रिटनमध्ये आढलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचा भारतात शिरकाव झाला असून देशात सध्या 58 रुग्ण आहेत. कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनविषयी माहिती देताना राजेश टोपे म्हणाले की, “राज्यात नव्या स्ट्रेनचे एकूण आठ रुग्ण असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरु आहे. नव्या स्ट्रेनबाबत महाराष्ट्र सरकार सजग आहे. ब्रिटनमधून आलेल्या प्रत्येकाला संस्थात्मक विलगीकरणात ठेवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. आयसीएमआरने सांगितलेला प्रोटोकॉल आपण पाळत आहोत. जनतेला सांगायचं आहे की आठ रुग्ण आढळले आहेत. लोकांनी जागरुक राहावं, घाबरुन जाऊ नये. परंतु काळजी घेणं गरजेचं आहे. कारण नव्या स्ट्रेनचा संसर्ग झपाट्याने होतो.”

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.