डिलिव्हरी बॉयला पुलावरून खाली फेकून देण्याची धमकी देत लुटले, एकाला अटक

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये एका डिलिव्हरी बॉयला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डिलिव्हरी बॉय ग्राहकाने परत केलेले पार्सल घेऊन रिक्षातून परतत असताना, रिक्षाचालक आणि रिक्षा मधील शेअरिंग केलेल्या प्रवाशांनी लुटले.त्यानंतर त्याला मारहाण केली तसेच पुलावरून खाली फेकून देण्याची धमकीही दिली.ही घटना सोमवारी ( दि. ४) भरदुपारी सर्व्हिस रोडवरील भूमकर चौकात घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली आणि अवघ्या पाच तासांमध्ये पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

मनीष कुमार भोगी पासवान (वय २२, रा. मांजरी हडपसर पुणे.
मूळ रा. बिहार) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात
फिर्याद दिली आहे. त्यानुसार परमेश्वर गंगाधर लोंढे (वय २३,
रा.लातूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनीष कुमार हे डिलिव्हरी बॉयचे काम करत असून, हिंजवडी परिसरात परत दिलेला पार्सल घेऊन परतत होता. हिंजवडीतील चौकातून त्याने रिक्षा पकडली. रिक्षामध्ये आणखी दोन सहप्रवासी होते. रिक्षाचालकाने त्याला त्याला निर्जन ठिकाणी नेले. रिक्षाचालक आणि सहप्रवाशांनी त्याच्याकडील मोबाइल, चांदीची चेन, दीड हजारांची रोकड, मोबाइलच्या अन्य अॅक्सेसरीज असा एकूण ४४ हजार ७०० रुपये किमतीचा ऐवज लूटला. त्यानंतर त्याला मारहाण केली. याशिवाय पुलावरून खाली फेकून देण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर घाबरलेल्या मनीष कुमारने हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा अवघ्या पाच तासांत माग काढला आणि अटक केली. या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.