माझ्याविरोधात खंडणीचा गुन्हा हा राजकीय आकसातून – गिरीश महाजन

जळगाव : भाजप नेते गिरीश महाजान यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याविरोधात पुण्यात दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हा हा राजकीय आकसातून आपल्यावर दाखल करण्यात आला असून त्याचा बोलविता धनी कोण ? हे सर्वांना माहिती आहे असं सांगतानाच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे.

मविप्र वादात भोईट गटाला मदत करून आ. गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी त्यांनी निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला होता. या प्रकरणी अखेर कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून महाजन यांनी त्यांच्यावरील हे आरोप फेटाळून लावले आहेत. तीन वर्षांपूर्वीची ही घटना आहे. तीन वर्षांमध्ये अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांना माझ्याविरोधात गुन्हा दाखल करावा वाटला नाही. ते स्वत: मोठे वकील आहेत. तरीही त्यांनी माझ्यासह ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो, असं महाजन म्हणाले आहेत.

या घटनेची सखोल चौकशी व्हावी म्हणून मी स्वत: उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा गुन्हा कुठे घडला? कधी घडला? ज्यांना मारहाण करण्यात आली ते लोक त्यावेळी कुठे होते? त्यांचे फोन ट्रॅक करा, अशी मागणी मी कोर्टाकडे केली आहे. त्यामुळे सत्य बाहेर पडेल, असं ते म्हणाले. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ ही मराठा समाजाची संस्था आहे. ती केवळ मराठा समाजापूरतीच मर्यादित आहे. या संस्थेच्या कार्यकारिणीवर इतर समाजाचे लोक येऊ शकत नाहीत, असं त्यांच्या बायलॉजमध्येच नमूद करण्यात आलेलं आहे. मी ओबीसी असून माझे इतर सहकारी वेगवेगळ्या समाजातील आहेत. मग ते या संस्थेचे सदस्य कसे होतील? आम्ही ही संस्था बळकावण्याचा प्रयत्न केला असं कसं म्हणता येईल? असे सवाल करतानाच या मागे बोलवता धनी कोण आहे, हे सर्वांनाच माहीत असून हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा दावाही त्यांनी केला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.