मावळातील सांगिसे येथील “त्या” खून प्रकरणी एका महिलेस अटक  

मावळ(नवनाथ आढाव): कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवार (दि.३१) रोजी एका शेळया चारण्यासाठी डोंगरावर गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीची डोक्यात व हातावर धारधार हत्याराने वार करत एका हत्या केल्याची घटना घडली होती. या खुनासंबंधी कोणतेही धागेदोरे नसतानाही कामशेत पोलीसांनी परिसरात चौकशी करून मोठ्या शिताफीने खुनातील एका महिला आरोपीला अवघ्या ३६ तासात अटक केली आहे. अटक केलेल्या महिला आरोपीला न्यायालयात हजर केले असता तिला ( दि. ८ ) पर्यंत न्यायालयीन कोठडी भेटली आहेे.

सविता सुरेश वाघमारे (वय अंदाजे ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अक्षय उर्फ सन्या वाघमारे (वय अंदाजे २५) याचा शोध सुरू आहे.बाजीराव नानासाहेब गरूड (वय ६५ रा. सांगिसे, ता.मावळ, जि.पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विशाल उर्फ यशवंत साईनाथ गरूड (वय-२४वर्षे, व्यव-नोकरी, रा. सांगिसे, ता.मावळ, जि. पुणे यांनी फिर्याद दिली).

मिळालेल्या माहितीनुसार,मृत बाजीराव हे शेळ्या चारण्यासाठी सांगिसे गावच्या हद्दीतील डोंगरावर ( दि. ३१ ) रोजी गेले असता सायंकाळ पर्यंत घरी परत न आल्याने गावातील नागरिकांनी त्यांचा डोंगरांमध्ये शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना ते मृत अवस्थेत आढळले. त्यांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार करून खून झाला असल्याने नागरिकांनी याबाबतची माहिती कामशेत पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञात हल्लेखोरावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कामशेतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम आणि पोलीस हवालदार समीर शेख, राम कानगुडे, अजय दरेकर यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरात चौकशी केली असता अक्षय वाघमारे हा त्याच्या बरोबर असलेल्या बाईसोबत सांगिसे येथील डोंगरावर पाण्याच्या झऱ्याच्या बाजूला गुरुवार (दि.३१) पर्यंत मुक्कामी असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी आजूबाजूला आणि गावातील लोकांकडे चौकशी केली असता त्यांच्या वर्णनाची माहिती भेटली. अधिक तपास करीत असता शनिवार (दि.२) रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वाडीवळे सांगिसे रस्त्यावर एक महिला संशयास्पद फिरत असल्याचे गुप्त माहिती समीर शेख यांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. तिला ताब्यात घेत न्यायालयात हजर केले असता (दि.८) पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. तर कामशेत पोलीस दुसरा आरोपी अक्षय वाघमारे याचा कसून तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.