मेहबूब शेख प्रकरण तपासासाठी महिला अधिकाऱ्याकडे सोपवा, नीलम गोऱ्हेंची मागणी

औरंगाबाद : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात एका तरुणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी त्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादीची फौज मैदानात उतरली आहे.परंतु राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मेहबूब शेखला मोठा दणका दिला आहे. कारण बलात्काराचा आरोप असलेल्या मेहबूब शेख प्रकरणात बी समरी रिपोर्टची शक्यता लक्षात घेत या प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात प्रसिद्धी पत्रक काढून म्हटलं आहे की, “या अत्याचाराच्या प्रकरणात पोलिस बी समरी फाईल करु शकतात. तसंच मेहबूब शेख हा तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांवर दबाव आणत आहे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबादमधील खाजगी शिकवणी घेणार्‍या २९ वर्षीय तरुणीने केला आहे. “माझ्यावर अत्याचार करणारा व्यक्ती हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखच आहे. आता मला जे काही बोलायचं आहे ते कोर्टात बोलेन,” असं तरुणीने म्हटलं आहे. मेहबूब शेख यांनी त्यांच्यावरील बलात्काराचे आरोप फेटाळले होते, त्यावर तरुणीने आपली बाजू मांडली आहे.

 

नीलम गोऱ्हेंनी जारी केलेल्या पत्रकात काय म्हटलंय?

याप्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी हे प्रसिद्धीपत्रक काढलं आहे. या पत्रात नीलम गोर्‍हे म्हणतात की, “औरंगाबादमध्ये एका पक्षाच्या कार्यकर्त्याने नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना मीडियाच्या माध्यमातून समोर आली आहे. यात आरोपी म्हणतो तो मी नव्हेच! याशिवाय पीडित मुलीवर आणि कुटुंबावर दबाव आणत आहे. त्यामुळे पूर्वीच्या केसेसप्रमाणे या केसमध्ये देखील पोलिसांकडून बी समरी रिपोर्ट दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घटनेचा तपास वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात यावा. तसेच औरंगाबाद इथल्या महिलांवरील अत्याचाराच्या बऱ्याच केसेसमध्ये बी समरी रिपोर्ट करुन त्या केसेस बंद करण्यात आल्या आहेत. ज्या प्रकरणात बी समरी रिपोर्ट करुन बंद केल्या आहेत त्याचा आढावा घेण्याची सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी द्यावी.”

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका अल्पसंख्याक तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले. 10 नोव्हेंबर रोजी मला फ्लॅटवर भेटण्यासाठी बोलावलं आणि 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भेटण्याच्या उद्देशाने गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.