राज्यात वन शिक्षण व संशोधन परिषद स्थापन करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या धर्तीवर राज्यात वन शिक्षण व संशोधन परिषद स्थापन करण्याबाबत तसेच ‘आयुष’ मार्फत राज्यात वन औषधी शिक्षण, संशोधन व विकास महाविद्यालय स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे  निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले.

राज्यातील कुंडल, चंद्रपूर, पाल, जालना, शहापूर आणि चिखलदरा येथील वन प्रशिक्षण संस्थांमध्ये आतापर्यंत आयोजित केलेली व सध्या सुरू असलेली प्रशिक्षणे, रिक्त पदे व निधीबाबत मंत्रालयात मंत्री श्री.राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला.

तेंदुपत्ता लिलाव प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी समिती

सन 2020 च्या तेंदु  हंगामात ज्या तेंदु घटकांमध्ये कोरोना महामारीमुळे तेंदूपाने कमी संकलित झाली. अशा तेंदु घटकाचे घोषित उत्पादन सुधारित करून स्वामित्व शुल्क सुधारित करण्याबाबतही वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.  तेंदु पाने संकलन कंत्राटदार यांच्यासाठी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नवीन तेंदू संकलन लिलावात दुसऱ्या फेरीत सहभागी होण्यासाठी सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा असे निर्देश श्री. राठोड यांनी यावेळी दिले. छत्तीसगड, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व अन्य काही राज्यांमध्ये तेंदू लिलाव करण्याची पद्धत अतिशय सुलभ आहे. त्या लिलावाला लवकर प्रतिसाद मिळतो, लिलाव लवकर होतो आणि मजुरांनाही त्याचा फायदा मिळतो. या पार्श्वभूमीवर तेंदु लिलाव प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देशही वनमंत्र्यांनी यावेळी दिले.

मौजे गलगले ता. कागल जि. कोल्हापूर (मूळ वसाहत निवळे ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर) येथील पुनर्वसनाबाबत श्री.राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आबिटकर यावेळी उपस्थित होते. पुनर्वसनासाठी लक्ष्मी टेकडी कागल येथील वनविभागाची जागा उपलब्ध करून देण्यासाठीचा प्रस्ताव कायदेशीर बाबी तपासून केंद्र शासनाला  सादर करण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी  दिले.

यावेळी प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर व  अन्य अधिकारी उपस्थित होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.