‘इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून कोकणच्या विकासासाठी बांधिल – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई:-  कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर ‘इनोव्हेटिव्ह’ संशोधनासाठी अनुकुल वातावरण व क्षमता आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची सूचना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राज्य शासन कोकणच्या शाश्वत विकासासाठी बांधिल असून खासदार श्री. पवार यांच्या सूचनेची अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.

 

कोकण विभागास (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे) आंतरराष्ट्रीय नवोन्मेश (इनोव्हेशन) विभाग म्हणून विकसित करण्यासंदर्भात राज्य सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ.राजेंद्र जगदाळे यांनी ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड  इनोव्हेटिव्ह रिजन’ संदर्भात सादरीकरण केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांनीही इनोव्हेटिव्ह रिजनच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शवत कोकणच्या व राज्याच्या विकासासाठी या संकल्पनेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले.

बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री आदिती तटकरे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्राला अनेक क्षेत्रात पुढे नेण्याचे प्रयत्न होत असताना कोकणला ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड  इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची मोठी संधी आहे. कोकणात त्यासाठी अनुकुल वातावरण आहे. कोकणात बुद्धिमत्ता, सर्जनशीलता प्रचंड आहे. मुंबई विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, मत्स्यविज्ञान संस्था याठिकाणी आहेत. कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करुन घेत तेथील निसर्गाला हानी न पोहोचवता या विभागाचा विकास करणे शक्य आहे. पुढील पन्नास – शंभर वर्षांचा विचार करुन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, असेही श्री.पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही या संकल्पनेचे सादरीकरण करुन त्यांच्या मान्यतेनंतर पुढे जावे, अशी सूचनाही श्री.पवार यांनी केली.

 

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कोकणातील तिन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. तिनही मंत्री आणि राज्य सरकार कोकणचा ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड  इनोव्हेटिव्ह रिजन’ विकास करण्यासाठी सकारात्मक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरणानंतर यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. पर्यावरणाचा ऱ्हास न करता कोकणचा विकास या माध्यमातून साधला जाणार आहे तसेच हा प्रकल्प राज्यासाठी भविष्यातील मोठी गुंतवणूक ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी व्यक्त केला.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘इनोव्हेशन’ क्षेत्राचा विकास होण्यासाठी हे बंधन आणि दबावापासून मुक्त असले पाहिजे. त्यासाठी राज्याचे  धोरण आवश्यक असल्याचेही श्री.ठाकरे यांनी सांगितले

‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन संदर्भातील मुद्दे

 

  • इनोव्हेटिव्ह रिजन अंतर्गत रायगड,रत्नागिरी, सिंधुदु्र्ग जिल्ह्यांचा समावेश
  • कोकणात विकासाची अमर्याद संधी
  • कोकणातील साधनसंपत्तीचा उपयोग करुन पर्यावरणपूरक उद्योगांचा विकास
  • पर्यावरण व आर्थिक क्षेत्राचा एकत्रित शाश्वत विकास
  • उद्योग,विद्यापीठ व संशोधन केंद्रांच्या सहभागातून ज्ञानाधारित समाजाची निर्मिती
  • नागरिकांच्याजीवनपद्धतीत व आनंद निर्देशांकात वाढीचे ध्येय्य.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.