अवैध धंद्यांवरील कारवाईची जबाबदारी पोलिसांवरच,विभागीय आयुक्तांची सूचना; पुरेसे बळ उपलब्ध करून देणार.

नाशिक : शहरासह उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत अवैध धंद्यांवर पोलीस विभागामार्फत कारवाई केली जाईल तसेच त्या त्या विभागास संबंधित प्रकरणात कारवाई करावयाची असल्यास त्यासाठी पोलीस प्रशासनाकडून पुरेसे बळ उपलब्ध करून दिले जाईल, असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत. ऑनलाईन जुगार, मद्यविक्री-वाहतूक यावर कारवाईची जबाबदारी त्यासंबंधीचे परवाने देणाऱ्या संबंधित विभागांची असल्याची भूमिका पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी घेतली होती. यामुळे अन्य शासकीय विभागात अस्वस्थता होती. याबाबत भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी गृहमंत्री, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांकडे तक्रार करत शासनाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती.

राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बोट क्लब येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी अवैध धंद्यावरील कारवाई संदर्भात कोणताही संभ्रम न करता अशी कारवाई प्रचलित पद्धतीनुसार पोलीस विभागाने करणे आवश्यक असल्याचे निर्देश दिले होते. त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. यावेळी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर , जिल्हा सरकारी वकील अजय मिसर आदी उपस्थित होते.

विभागात पोलीस यंत्रणा अवैध धंद्यांवर मोठय़ा प्रमाणावर कारवाई करत आहे. अशा प्रकारे शहर पोलिसांनीदेखील कारवाई करावी असे निर्देश गमे यांनी दिले. साथरोग नियंत्रण कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा या संदर्भात वेळोवेळी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर होते आहे किंवा कसे याबाबत दक्षता पोलीस विभागाकडून घेतली जाईल. त्याचे उल्लंघन झाल्यास त्यावर पोलीस विभाग योग्य ती कारवाई करेल. त्यासाठी कोणाच्याही तक्रारीची आवश्यकता राहणार नसल्याचे गमे यांनी सूचित केले.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात रोलेट लॉटरी, ऑनलाइन जुगार, परवाने आणि त्या अनुषंगाने आलेल्या तक्रारींची दखल घेऊन पोलीस विभाग प्रभावी कारवाई करेल, असा निर्णय निर्णय घेण्यात आला. अशी कारवाई झाल्यानंतर त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी अशा अवैध व्यवसायांवर अन्य विभाग देखील त्यांच्या अधिकार कक्षेनुसार पुढील कारवाई करतील, असे यावेळी निश्चित झाले. शहरात अवैध धंद्यांविरुद्ध शहर पोलिसांकडून प्रभावी कारवाई सुरू राहील, असे पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सांगितले.

..तर न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर परिणाम

पोलीस विभागास कोणत्याही अवैध बाबी अथवा सक्षम प्राधिकारी यांनी जारी केलेल्या अधिसूचना यांचे उल्लंघन दिसून आल्यास थेट कारवाई करण्याचे अधिकार विविध फौजदारी कायद्यांतर्गत असल्याची बाब जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी निदर्शनास आणून दिली. यापूर्वी पोलिसांनी स्वयंस्फूर्तीने अशा प्रकरणांमध्ये कारवाई के लेली असून अशी अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी अधिकार कक्षाबाबत संभ्रम निर्माण केल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम त्या न्यायप्रविष्ट प्रकरणांवर होईल असे मत व्यक्त केले.

नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रातील सर्व अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशामुळे शहरातील अवैध धंद्यांवर पुढील काळात नियंत्रण प्रस्थापित होऊन नागरिकांना सुरक्षित आयुष्य जगता येईल.

– आ. देवयानी फरांदे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.